Weather Update Today : महाराष्ट्रासह देशात आजही पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 10 डिसेंबरला दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ-माहे आणि लक्षद्वीपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) देशाच्या विविध भागांसाठी अलर्ट जारी केला असून, येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
पुढील चार ते पाच दिवसांत पावसाची शक्यता
देशाच्या हवामानावर चक्रीवादळाचा परिणाम आणखी काही दिवस दिसून येणार आहे. महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पुढील काही दिवस पावसाची शक्यता कायम आहे. आजही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव परिसरात चक्रीवादळामुळे पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
आयएमडीच्या अंदाजानुसार, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ-माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर केरळ-माहे आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. अंदमान-निकोबार बेटे, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालय पश्चिम बंगाल, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येत्या काही दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेशावर परिणाम पाहायला मिळेल. यामुळे जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विखुरलेला हिमवर्षाव होण्याची किंवा पाऊस पडण्याची शक्यता. त्यामुळे मैदानी भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या लोकांना सकाळ-संध्याकाळ थंडी जाणवत आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट
IMD नुसार, सोमवार 11 डिसेंबरपासून देशाच्या विविध भागात किमान तापमानात घट होईल. उत्तर भारतात येत्या काही दिवसांत थंडी वाढणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात 2 ते 3 अंशांची घट होईल. यासोबतच धुक्याचा चादरही दिसेल. 13 डिसेंबरपर्यंत देशाच्या विविध भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.