Weather Update : देशातील वातावरणात सतत बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे पावसानं हजेरी लावली आहे. उत्तर भारतातील काही राज्यात पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy cyclone) मध्य प्रदेशमध्ये चांगलाच प्रभाव जाणवत आहे. मध्य प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. आजही राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मान्सून पुढे सरकरण्यास अनुकूल स्थिती
पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, दिल्लीसह उत्तर प्रदेश, राजस्थानच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे.
आज मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
मध्य प्रदेशात मान्सून दाखल होण्यापूर्वीच पावसानं हजेरी लावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा चांगलाच परिणाम मध्य प्रदेशमध्ये दिसून आला. भोपाळ आणि आसपासच्या जिल्ह्यात काल दुपारी 12 वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनपूर्वीच बिपरजॉय वादळामुळं मध्य प्रदेशात पावसानं दस्तक दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आता रेवा-शहडोलकडे वळले आहे. याआधीही शुक्रवारी (23 जून) राजधानी भोपाळसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये बिपरजॉय वादळाचा प्रभाव दिसून आल्याची माहिती हवामान खात्यानं दिली. आजही राज्यात बिपरजॉय वादळाचा प्रभाव दिसून येईल. त्यामुळं मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 26 जूनपर्यंत उत्तराखंडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यात देखील पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्रात पावसाची हजेरी
हवामान विभागानं (imd) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. मुंबईत (Mumbai) देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने हजेरी लावल्यानं राज्यातील बळीराजा सुखावला आहे. पावसाअङावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. आता काही भागात चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महत्त्वाच्या बातम्या: