Today's Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट (Cold Wave) परसली आहे. यासोबतच दाट धुके आणि अनेक भागांत बर्फवृष्टी (Snowfall) होताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागात 'रेड' अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्याचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.


दिल्ली, उत्तर प्रदेशात थंडीची लाट


पुढील दोन दिवस लखनौसह उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दिल्लीतही तापमानाचा पारा घसरला आहे. सोमवारी सकाळी दिल्लीत मोसमातील सर्वात कमी तापमान 3.3 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, शहरातील बहुतेक भागांमध्ये दाट धुकं पाहायला मिळालं. दिल्लीत आज थंडीची लाट येण्याचा शक्यता असून आयएमडीने थंडी आणि धुक्याचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तरेकडील थंडीची लाट आणि धुके  20 जानेवारीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.


'या' भागात पावसाची शक्यता


आज 16 जानेवारी 2024 पासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे 16 आणि 17 जानेवारीला जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगळ्या ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 14 जानेवारी 2024 पासून केरळ-माहे, दक्षिण आतील कर्नाटक, तामिळनाडू-पुडुचेरी-कराईकल, रायलसीमा आणि किनारी आंध्र प्रदेश आणि यानामच्या लगतच्या भागात ईशान्य मोसमी पाऊस थांबला आहे. आज देशाच्या दक्षिणेसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.