Weather Update : सध्या देशभरात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. अनेक राज्यात थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत उत्तर भारतात (North India) थंडीचा जोर अधिक आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत. दरम्यान, कडाक्याच्या थंडीचा सामना करणाऱ्या उत्तर भारतातील नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी हवामान विभागाकडून (Meteorological Department) देण्यात आली आहे. येत्या 24 तासात थंडीची लाट कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


थंडीचा जोर वाढल्यामुळे उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. पुढच्या 24 तासाचा थंडीचा रोज कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागात तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, त्यानंतर काही भागात पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.


मैदानी भागात 23 ते 25 जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता 


वेस्टर्न डिस्टर्बन्स 20 जानेवारीच्या रात्री हिमालयीन भागात पोहोचणार आहे. जो 25 जानेवारीपर्यंत राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. त्यामुळे 21 जानेवारीपासून डोंगरावर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. त्याचवेळी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य भारतातील मैदानी भागात 23 ते 25 जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


'या' राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता 


22 आणि 23 जानेवारीला पंजाबच्या काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. 24 आणि 25 जानेवारीलाही पावसाची शक्यता आहे. 22 जानेवारीला दिल्लीसह चंदीगड आणि हरियाणामध्ये पावसाची शक्यता आहे. 23 आणि 24 जानेवारी रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 25 जानेवारीलाही दुर्गम भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात 23 जानेवारीला काही भागात तर 24 जानेवारीला बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 जानेवारीला पूर्व उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


तापमानात वाढ


19 आणि 20 जानेवारी रोजी तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 3 दिवस तापमानात विशेष बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. आज (19 जानेवारी) उत्तर राजस्थानच्या विविध भागात थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता आहे. तर, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तर मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर थंडी कमी होईल.


गेल्या 24 तासात थंडी कायम


गेल्या 24 तासांत दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी कायम आहे. बहुतांश ठिकाणी 1 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानमधील सीकरमधील चुरु येथे उणे 1.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Update : आजही राज्यात थंडी कायम, बहुतांश जिल्ह्यात 15 अंशाच्या खाली तापमान; तर उत्तर भारतातही पारा घसरला