Weather Update Today : देशात सध्या थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. पुढील 48 तासात देशातील हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र 3.1 किमीपर्यंत पसरल्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे. यामुळे देशासह राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतातासह काश्मीर खोऱ्यात आज पावसाची शक्यता आहे. यासोबतच महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे.


पुढील तीन दिवस पावसाची शक्यता 


दरम्यान, बांगलादेशसह दक्षिण भारतात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र पसरलं आहे. त्याचा परिणाम देशासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जाणवत आहे. पावसाळी वातावरणामुळे तापमान दोन ते तीन अंशांनी घसरेल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 


उत्तर प्रदेशच्या काही भागात 22 तारखेला थंडी वाढण्याचा अंदाज आहे. 23 ते 25 जानेवारी देशात विविध भागात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे. 22 जानेवारीला उत्तराखंडमधील काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. पंजाब आणि त्रिपुराच्या काही भागात दाट धुके दिसून येत आहे. हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मध्यम धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. 22 ते 23 जानेवारी दरम्यान मध्य प्रदेशातील काही भागात तीव्र थंडी असण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रात पावसाची शक्यता


देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व विदर्भात 22 जानेवारीनंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे. शिवाय मध्य महाराष्ट्रातही पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळेल, असा अंदाज आयएमडीने म्हटलं आहे. 22, 23 आणि 24 जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


दिल्ली, पंजाब, राजस्थान गारठलं


उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी, धुके आणि थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी वाढली आहे. येत्या काही दिवसांत कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडीसह धुक्याचा कहर सुरू आहे. हवामान खात्याने धुक्याबाबत अलर्टही जारी केला आहे. रविवारी किमान तापमान 4.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 


सोमवारी दिल्लीत दाट धुके पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यताही विभागाने वर्तवली आहे. धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या ट्रेन चार तास उशिराने धावत आहेत. पंजाबमध्येही सध्या थंडीपासून दिलासा मिळत नसल्याचं दिसत आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये आज म्हणजेच रविवारी थंडीमुळे लोकांचे हाल झाले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील हिस्सार तीव्र थंडीच्या कचाट्यात आहे, जेथे किमान तापमान 2.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.