IMD Weather Update : पुढील काही दिवसात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढला आहे. दाट धुक्याची चादर आणि हाडं गोठवणारी थंडी यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर बांगलादेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह काश्मीर खोऱ्यात पावसाची शक्यता आहे. आधीच या भागात पावसाने हजेरी लावी असून पुढील 24 तासांत पावसाची शक्यता आहे.


उत्तर भारतात थंडीची लाट


पर्वतीय भागात पारा सतत घसरत असल्याने संपूर्ण उत्तर भारतात तसेच देशाच्या मध्य आणि पूर्व भागात थंडीची लाट कायम आहे. बिहारमध्ये कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. हिवाळ्याची स्थिती कायम असून काही भागात सूर्यकिरणं अधूनमधून बाहेर पडताना पाहायला मिळत असून काही भागात सूर्यदर्शन होणं कठीण आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात नागरिक त्रस्त झाले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही कडाक्याची थंडी जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बुधवारी सकाळी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हलका पाऊस झाला. दिल्लीत बुधवारी दाट धुक्यापासून दिलासा मिळण्याची आशा आहे.


डोंगराळ भागात बर्फवृष्टीची शक्यता


पूर्व उत्तर प्रदेश आणि पंजाबसह उत्तर-पश्चिम भारतात दिवसभराच्या किंचित दिलासा दिल्यानंतर थंडी पुन्हा वाढली आहे. अनेक ठिकाणी दाट धुके पाहायला मिळालं. रात्री आणि सकाळच्या वेळी तापमानात कमालीची घट झाली आहे. किमान तापमानात कमालीची घट नोंदवली गेली आहे. अनेक ठिकाणी पारा घसरला आहे. 26 जानेवारीपर्यंत धुके आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीपासून दिलासा मिळणार नाही. 25 जानेवारीपर्यंत डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता असून ही शक्यता प्रत्यक्षात आल्यास थंडी आणखी वाढणार आहे.


'या' भागात पावसाची शक्यता


भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची लागण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि इतर भागात हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. त्यामुळे हाडं गोठवणारी थंडी आणि धुक्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पुढील 24 तासात मध्य आणि उत्तर दिल्लीत रिमझिम पावसाची शक्यता आहे. दिल्ली आणि परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. महत्त्वाचं काम असेल तरच लोक घराबाहेर पडत आहेत. रस्त्यांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसून येत आहे. दुसरीकडे दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे तसेच हवाई वाहतुकीवरही वाईट परिणाम झाला आहे. अनेक गाड्या वेळापत्रकापेक्षा उशिराने धावत आहेत.