नवी दिल्ली : शहिदांचं बलिदान कदापि विसरणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी देशवासियांना ग्वाही दिली. ‘मन की बात’मधून मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत मोदींनी यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहिली.
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला आज 9 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. नऊ वर्षानंतर या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा भरल्या आहेत. या हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या मनावरील आघात अद्याप कायम आहे. हल्ला झालेल्या बहुतेक ठिकाणांवर आज मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
दहशतवादाने जगाला आव्हान दिलं आहे. यापुढे दहशतवादाची पाळंमुळं नष्ट करायची असतील, तर मानवतावादी देशांना एकत्र येण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले. शिवाय त्यांनी ‘मन की बात’मध्ये संविधान दिनाचाही उल्लेख केला.
''संविधान लोकशाहीचा आत्मा''
''भारताचं संविधान लोकशाहीचा आत्मा आहे. संविधान सभेच्या सदस्यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. भारताच्या संविधानावर गर्व वाटतो. संविधान तयार करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्त्वाची छाप आहे'', असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.