रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. नक्षलग्रस्त बिजापूर येथे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. निवडणुकीच्या एक दिवसआधी झालेल्या या घटनेमुळे छत्तीसगडमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

चकमकीनंतर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या शोध मोहिमेत एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. ठार केलेल्या नक्षलवाद्याकडे एक बंदूक आणि इतर शस्त्रास्त्रे सापडली आहेत.

दुसरीकडे नक्षलवाद्यांकडून कांकेरच्या कोयली बेडा भागात सहा आयईडी स्फोट करण्यात आले. या दरम्यान चकमकीत बीएसएफचा एक जवान गंभीर जखमी झाला. महिंदर सिंह असे या जवानाचे नाव असून त्याला त्वरीत उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उद्या (12 नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी सुरक्षा दलावर मोठा दबाव आहे. निवडणूक योग्य पद्धतीने पार पडावी यासाठी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीही छत्तीसगडच्या दंतेवाडा परिसरात नक्षलवाद्यांनी केंद्रीय औद्योगिक दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य केले होते. या हल्ल्यातदेखील सुरक्षा दलातील एक जवान शहीद झाला होता, तर तीन नागरिकांचाही मृत्यू झाला होता. गेल्या 10 दिवसांत सुरक्षा दलावर नक्षलवाद्यांकडून तिसऱ्यांदा हल्ला करण्यात आला आहे. यापूर्वी देखील 30 ऑक्टोबर रोजी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता.

छत्तीसगडच्या विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होणार आहे. यात पहिल्या टप्यात 12 नोव्हेंबरला 18 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर 20 नोव्हेंबरला बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागांव आणि राजनंदगांव या नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये निवडणूक लढवली जाणार आहे.