नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. गौतम गंभीर म्हणाला की, "अशा भ्याड हल्ल्यांनंतर पाकिस्तानशी आता चर्चा करण्यात अर्थ नाही, पाकिस्तानशी आता चर्चा केवळ युद्धाच्या मैदानातच करायला हवी."


गौतम गंभीर म्हणाला की, "भारतीय लष्कराने अद्याप युद्ध सुरु केलेले नाही, परंतु ते खूप योग्य पद्धतीने पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावतील. मी भारतीय लष्करासोबत आहे. अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून."

गंभीरने ट्विटरवर त्याचा राग व्यक्त केला आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "पूर्वी आपण पाकिस्तानशी चर्चा करत होतो. परंतु आता चर्चा करण्याची वेळ नक्कीच नाही. आता चर्चा टेबलवर नाही तर थेट रणांगणात व्हायला हवी."

आणखी एका ट्वीटमध्ये गौतम गंभीरने म्हटले आहे की, 'हो, चला फुटीरतावाद्यांशी बोलुयात. हो, चला पाकिस्तानशी संवाद साधूयात. मात्र यावेळी चर्चा टेबलवर होऊ शकत नाही. आता युद्धभूमीवर उत्तर देण्याची वेळ आली आहे. आता हद्द झाली. श्रीनगर-जम्मू हायवेवर 18 (ट्वीट करतानाचा आकडा) सीआरपीएफ जवान आयईडी स्फोटात शहीद.'