Sri Lanka Crisis: श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटातून जात आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. जनतेचा रोष इतका वाढला आहे की त्यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावली. आर्थिक संकटामुळे गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या श्रीलंकेसोबत भारत आजही आपली मैत्री निभावत त्यांच्या पाठीशी उभा आहे. 


आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताने आश्वासन देत म्हटले आहे की, आम्ही यापूर्वीही पाठिंबा दिला होता आणि आजही आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्ही सर्व शक्य मार्गांनी श्रीलंकेला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यांना नेहमीच मदत केली आहे. ते त्यांच्या समस्येवर काम करत आहेत, काय होते ते पाहू. जयशंकर म्हणाले की, श्रीलंकेत सध्या निर्वासितांचे कोणतेही संकट नाही. श्रीलंकेतील भारताच्या उच्चायुक्तांनी एक निवेदन दिले आहे, या कठीण परिस्थितीतही भारत आपल्या मैत्रीचे कर्तव्य पार पाडेल आणि आजही आम्ही श्रीलंकेच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत, असे यात म्हटले आहे.


आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी जगातील कोणत्याही देशाने मदतीचा हात पुढे केला नाही. मात्र अशातच भारताने आपले मोठे मन दाखवत श्रीलंकेला सर्व प्रकारे मदत करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, शनिवारपासून सुरू असलेल्या निदर्शनांनंतर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. आता विक्रमसिंघे यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री एक एक करून राजीनामे देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आपला राजीनामा देतील, असं सांगण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Sri Lanka Protests Timeline : जनतेच्या विरोधानंतर श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा राजीनामा, नक्की काय घडलं? घटनाक्रम जाणून घ्या...
Sri Lanka protest : आंदोलक आक्रमक, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचेल खासगी घर पेटवले