नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारतीय वायू दलाने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. "वायूसेनेचं काम लक्ष्य भेदणं हे असतं. तिथे किती नुकसान झालं हे आम्ही मोजत नाही," असं एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी सांगितलं. तसंच "आम्हाला जे काही टार्गेट मिळतं आम्ही केवळ तेच उद्ध्वस्त करतो. मृतांचा आकडा नेमका किती आहे, याची माहिती सरकारच देऊ शकतं," असंही त्यांनी स्पष्ट केलं.



एअर स्ट्राईकनंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत वायू दलाचे प्रमुख बी एस धनोआ बोलत होते. बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर पाकिस्तान आणि काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आज वायू दलाने पत्रकार परिषद घेतली आणि बॉम्ब टार्गेटवरच टाकल्याचं म्हणाले.

"जर आम्ही योग्य टार्गेट भेदले नाहीत आणि केवळ जंगलातच बॉम्ब पाडले तर पाकिस्तानने उत्तर का दिलं?," असं धनोआ म्हणाले. वायू दलाने यशस्वीरित्या लक्ष्याला भेदलं असं नमूद करत पाकिस्तानच्या F16 विमानांना उद्ध्वस्त करण्यासाठी MIG21 बायसेनचा वापर का केला याचं कारणंही धनोआ यांनी यावेळी सांगितलं.


"MIG21 आमचं कामगार विमान असून ते अपग्रेड केलं आहे. या विमानाचं रडार उत्तम आहे. आमच्या ताफ्यात जेवढे विमान आहेत, ते लढाईत वापरतात. आमचं ऑपरेशन अजूनही सुरु आहे, यासाठी आम्ही सगळ्यांसमोर ही बाब सांगू शकत नाही," असं बीएस धानोआ यांनी स्पष्ट केलं.

तसंच पाकिस्तानचं विमान उद्ध्वस्त करणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमन यांच्याबाबत विचारलं असता धानोआ म्हणाले की, "अजून त्यांच्या फिटनेस चाचणी सुरु आहे, जर ते फिट असतील, तर पुन्हा लढाऊ विमान उडवू शकतात."

40 जवान शहीद आणि एअर स्ट्राईक
14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायूदलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करुन जैश-ए-मोहम्मदचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते.

संबंधित बातम्या

मसूद अजहर जिंदा है : पाकिस्तानी मीडियाचा दावा

भारताच्या हवाई हल्ल्यात 'जैश'चं मोठं नुकसान, मसूदच्या भावाची कबुली, मात्र पाकिस्तानी लष्कराला अमान्य


भारतीय समजून पाकिस्तानी लोकांनी त्यांच्याच पायलटला मारले