नवी दिल्ली : "सचिन वाझे प्रकरणाचा परिमाण सरकारवर होईल, यावर आमचा विश्वास नाही," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. सोबतच महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत. केरळमधील काँग्रेसचे नेते पीसी चाको यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. 


महाविकास आघाडीत सारं काही सुरळीत : शरद पवार
सचिन वाझे प्रकरण आणि त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला पोहोचणारी हानी यावरुन शरद पवार नाराज असल्याची चर्चा होती. शिवाय यावरुन महाविकास आघाडीमध्ये मतमांतरं असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र "महाविकास आघाडीत कोणतीही अडचण नाही. काही अडचणी येतात, त्यावर एकत्र मिळून तोडगा काढतात," असं शरद पवार यांनी सांगितलं.


'सचिन वाझे प्रकरणाचा सरकार परिणाम होणार नाही'
सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार म्हणाले की, "एका पोलीस अधिकाऱ्याच्या तपासाचा परिणाम सरकारवर होईल यावर आमचा विश्वास नाही. एनआयए याचा तपास करत आहे. त्यावेळी आमचं काम आहे त्यांची मदत करणं. ज्या लोकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, त्यांना त्याची जागा दाखवणं यासाठी एनआयए तपास करणार यात काहीही चुकीचं नाही."


"महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं आहे, त्यामुळे सगळे एकजूट झाले आहेत. चुकीचं काम करणाऱ्या लोकांना शोधलं. त्यांचा पर्दाफाश केला आणि सक्तीने पाऊल उचलू शकतो हे दाखवून दिलं," असंही शरद पवार यांनी नमूद केलं.


मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर काय म्हणाले?
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी बोलताना ते म्हणाले की, "आम्ही कायमच भेटतो आणि बोलतो. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमच्यात चर्चा होते."


परमबीर सिंह यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा : शरद पवार
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीविषयी चर्चा सुरु आहे. यावर शरद पवार म्हणाले की, "परमबीर सिंह यांची बदली होणार आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारा. कोणाच्या नियुक्ती आणि बदलीबाबत आम्हाला रस नाही."