नोटाबंदीचा उद्देश हा पैसा जमा करणं नव्हता, तर कर वाढवणं, दहशतवाद, नक्षलवाद रोखणं, नगदी व्यवहार कमी करणं, डिजिटायझेशन करणं आणि काळा पैसा रोखणं हा होता आणि यामध्ये बदल झाला आहे, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. आरबीआयने आकडेवारी जाहीर केल्यानंतर जेटलींनी पत्रकार परिषदेद्वारे याबाबत माहिती दिली.
नगदी व्यवहार कमी करणं हा नोटाबंदीचा हेतू होता. नोटाबंदीनंतर आतापर्यंत नगदी व्यवहार जवळपास 17 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे नोटाबंदीचा उद्देश साध्य झाला आहे. भविष्यातही या निर्णयाचा फायदा होईल. आता भविष्यात निवडणुकांमधील काळा पैसा रोखणं हे सरकारचं उद्दीष्ट असल्याचंही जेटलींनी सांगितलं.
बँकांमध्ये पैसा जमा करणं हा नोटाबंदीचा उद्देश होता, अशी टीका केली जात आहे. मात्र ज्यांना काळा पैसा कसा रोखायचा याबाबत माहिती नाही, त्यांच्याकडूनच अशी टीका केली जात असल्याचं जेटली म्हणाले.
नोटाबंदीमुळे नगदी व्यवहार कमी झाले आणि नोटांचं प्रमाणही कमी झालं. त्यामुळे छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवाया आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण कमी झाल्याचा दावा जेटलींनी केला.
नोटाबंदीची आकडेवारी
आरबीआयने वार्षिक आर्थिक अहवालात नोटाबंदीबाबत माहिती दिली आहे. या अहवालात मार्च 2017 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली. 1000 रुपयांच्या जवळपास 99 टक्के नोटा परत आल्या आहेत. एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
नोटा छपाईचा खर्च वाढला
दरम्यान नोटा छपाईचा खर्चही या आर्थिक वर्षात दुप्पट झाल्याची माहिती आरबीआयने दिली. 2016-17 या वर्षात नोटा छपाईचा खर्च 7 हजार 965 कोटी रुपये झाला आहे, जो 2015-16 या वर्षात 3 हजार 421 कोटी रुपये एवढा होता.
नोटाबंदीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. त्यानंतर 500 आणि 2000 च्या नव्या नोटा चलनात आणल्या. नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यात आल्या. ज्याची आकडेवारी आरबीआयने जवळपास दहा महिन्यांनी जाहीर केली आहे.
आरबीआयचा आर्थिक अहवाल काय सांगतो?
- नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले
- एक हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपये म्हणजे 8.9 कोटी नोटा बँकेत परतल्या नाही.
- 500 रुपयांच्या जुन्या नोटेमध्ये 7 हजार 100 कोटी रुपये परत आले नाही आणि उर्वरित नोटा बनावट आणि फाटलेल्या होत्या.
- एकूण 16 हजार कोटी रुपये परत आले नाही.