Indian Army's 5 Most Dangerous Postings: भयंकर उष्णता असो, की बर्फ पडत असो. वादळ आले पाऊस किंवा शत्रूच्या गोळ्या. भारतीय लष्करामुळेच आपल्याला देशाच्या आत सुरक्षित वाटतं. मग ते जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन असो की, गरम थारचे वाळवंट. चीनच्या सीमेला लागून असलेला अरुणाचल प्रदेश असो किंवा छत्तीसगडमधील डास आणि नक्षलवाद्यांनी भरलेला दंतेवाडा असो. प्रत्येक ठिकाणी आपले जवान स्वतःची काळजी न करता आपलं कर्तव्य बजावत असतात. भारतातील ही पाच सर्वात धोकादायक ठिकाणे आहेत, जिथे भारतीय सैनिकांनी कसलीही काळजी न करता तिरंगा फडकवला आहे. 


सियाचीन (Siachen) 


सियाचीन ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. येथील तापमान - 60 अंश सेल्सिअस इतके आहे. येथील तापमान इतके कमी आहे की, कोणाचेही रक्त देखील गोठू शकते. येथे ऑक्सिजन पातळी फक्त 10 टक्के इतकी आहे. सियाचीन हे नेहमीच जगातील सर्वात महत्त्वाचे सामरिक ठिकाण राहिले आहे. भारत आणि पाकिस्तानसाठी हे ठिकाण खूप महत्वाचे आहे. हे ठिकाण असे आहे की, जिथून भारतीय सैनिक पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांवर लक्ष ठेवतात. - 60 अंश सेल्सिअस अशा कमी तापमानात, कमी ऑक्सिजन आणि जास्त उंचीच्या भागात सैनिकांना स्मरणशक्ती कमी होणे, झोप न लागणे, त्वचा जळणे इत्यादी समस्या होतात. ज्या ठिकाणी दोन सेकंदात पाणी गोठते, तिथे राहणे किती कठीण असेल याची कल्पना करा. चहा बनवणेही सोपे नाही. पण आपले जवान पूर्ण जोमाने, धैर्याने आणि ताकदीने सीमेचे रक्षण करण्यात गुंतलेले आहेत.


द्रास (Dras)


द्रास हे भारतातील सर्वात थंड निवासी क्षेत्र असून हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड ठिकाण मानले जाते. 1999 मध्ये पाकिस्तानी घुसखोरांच्या हल्ल्यानंतर कारगिल युद्ध सुरू झाले. तेव्हा हा परिसर चर्चेत आला होता. या ठिकाणी झालेल्या युद्धात 500 हून अधिक भारतीय जवान शहीद झाले होते. हा भाग जगातील सर्वात संवेदनशील सीमांपैकी एक आहे. येथे तैनात असलेल्या सैनिकांना प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो. द्रासला लडाखचे द्वार असेही म्हणतात. द्रास 10,800 फूट उंचीवर आहे. येथील कमाल तापमान - 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. किमान - 45 पर्यंत. सियाचीनचे तापमान कमी असले, तरी द्रासमध्ये वाहणारे जोरदार वारे, ही थंडी अधिक प्राणघातक बनवते. येथे 1999 मध्ये टोलोलिंग आणि टायगर हिल पाकिस्तानींनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पाकिस्तान सतत एनएच-1 ला टार्गेट करत होता.


दंतेवाडा (Dantewada)


छत्तीसगडचा एक असा भाग जिथे तीन गोष्टी अतिशय धोकादायक आहेत. जंगल आणि त्यात राहणारे डास आणि नक्षलवादी. हा भाग नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असल्याचे बोलले जाते. हे तेच ठिकाण आहे जिथे एप्रिल 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी 76 CRPF जवानांची हत्या केली होती. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या 82 व्या बटालियनचा जवळजवळ सफाया केला. हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांची शस्त्रेही लुटण्यात आली. ऑक्टोबर 2018 मध्ये दूरदर्शन कॅमेरापर्सन अच्युतानंद साहू आणि इतर दोन पोलीस नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. येथील जंगलात पोस्टिंग करताना आर्द्रता ही सर्वात मोठी समस्या असते. धोका हा डास आणि वन्य प्राण्यांकडूनही आहे. नक्षलवाद्यांच्या गोळ्यांमुळे आपल्या सैनिकांचे तितके नुकसान होणार नाही, पण डास आणि जंगलातील हवामान यात फरक पडतो.


थार वाळवंट (Thar Desert)


राजस्थानच्या थार वाळवंटात भारत-पाकिस्तान सीमेचा सर्वात मोठा भाग आहे. याची लांबी सुमारे 1040 किमी आहे. या सीमेच्या सुरक्षेसाठी सुमारे 3 लाख सैनिक तैनात आहेत. येथे वाळूचे वादळ, घुसखोरी आणि सीमेपलीकडून अधूनमधून युद्धविरामाच्या घटनांमध्ये तापमानाचा भयंकर खेळ सुरू असतो. येथे उन्हाळ्यात दिवसा कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. या उन्हाळ्यात सोसाट्याचा वारा आणि वाळूच्या वादळात सीमेवरील सैनिकांची ड्युटी अत्यंत कठीण असते.


अरुणाचल प्रदेश भारत-चीन सीमा (Arunachal Pradesh India-China Border) 


भारत आणि चीनमधील सीमावादाचा आणखी एक गड म्हणजे अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमा. ही सीमा सर्वात धोकादायक तैनातींमध्ये गणली जाते. कारण चिनी सैनिक येथे अनेकदा भारतीय चौक्यांवर हल्ले करतात. यामुळे दोन्ही सैन्यामध्ये सतत संघर्ष होतो. येथे तवांगजवळ दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने सैनिक तैनात करण्यात आले आहेत. हा भाग रस्त्यांनी पूर्णपणे जोडलेला नाही. त्यामुळे समस्या अधिक आहेत. याशिवाय पावसाळ्यात येथील वातावरण अधिक धोकादायक बनते, कारण धुक्यामुळे सीमेपलीकडील हालचाली दिसत नाहीत.