मुंबई : जंगल सफारीबाबत नेहमीच अनेकांना कुतूहल वाटतं. काहींनी याबाबतचा अनुभव घेतलाही असेल. विस्तीर्ण पसरलेल्या वनराईमध्ये वावरणाऱ्या वन्यजीवांना पाहण्य़ाची संधी य़ा सफरीच्या निमित्तानं मिळते. वाघ आणि सिंहाचं दर्शन या सफारीत झाल्यानंतर तर अनेकांचाच आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. पण, ही सफारी प्रत्येक वेळी आनंद देणारीच असेल असं नाही.


काही वेळेस जंगल सफारीदरम्यान अशा काही घटना घडतात जेव्हा अक्षरश: थरकाप उडतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका जिप्सीतून काही लोक व्याघ्रप्रकल्पात सफारीसाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. या सफारीमध्ये त्यांना वाघोबाचं दर्शन घडतं खरं. पण, वाघोबाला पाहून सर्वांचाच थरकाप उडतो.


सोशल मीडियावर कमालीच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये वाघ पाहण्यासाठी सफारीची ही जिप्सी जंगलात एका ठिकाणी येऊन थांबते. प्रत्येकालाच उत्सुकता असते ती वाघाला पाहण्याची. तितक्यातच झाडांमध्ये कसलीशी हालचाल होते आणि एकाएकी मोठ्या आवेगात डरकाळी फोडत हा वाघ पुढे सरसावतो. हे सारं पाहून काळजाचा ठोका चुकलेल्या त्या मंडळींची एकच किंकाळी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.


वाघ भलामोठा असल्यामुळं तो अंगावर धावून येत असतानाच लोकांनी किंकाळीनं मोठ्या प्रयत्नांनी त्याला दूर पळवलं. अवघ्या काही क्षणांमध्ये यावेळी अनेकांचाच थरकाप उडाल्याचं पाहायला मिळालं. बरं व्हिडिओ पाहणाऱ्यांचीही  काहीशी हीच अवस्था.





आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  वाघाला पळवून लावण्यासाठीचं तंत्र कसं उपय़ोगी ठरलं हे त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमधून स्पष्ट केलं. आतापर्यंत य़ा व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर, अनेकांनी तो रिट्वीटही केला आहे. मुख्य म्हणजे येत्या काळात जंगल सफारीसाठी जाणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ म्हणजे जणून एक सतर्कतेचा इशाराच आहे असं म्हणायला हरकत नाही.