तामिळनाडू : काँग्रेस नेते (Rahul Gandhi) राहुल गांधी हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांच्या अनोख्या अंदाजासाठीही ओळखले जातात. कधी स्थानिक भाषेमध्ये संवाद साधणं असो किंवा मग, एखाद्या ठिकाणी जाऊन आपल्या एखाद्या कृतीनं उपस्थितांचं लक्ष वेधणं असो. राहुल गांधी जिथे जिथे सतत चर्चा तिथे तिथे, असाच काहीसा माहोल अनेकदा पाहायला मिळतो. तामिळनाडूमध्येही सध्या असंच काहीसं चित्र दिसून आलं.


तामिळनाडू विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी त्या भागाच्या दौऱ्यावर गेले. इथं त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सेंट जोसेफ मॅट्रिक्युलेशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी यावेळी इथं चक्क पुशअप्सही मारले.


विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापुरताच सीमीत न राहता राहुल गांधी यांनी त्यांच्याशी एकरुप होण्यासाठी एका वेगळ्या मार्गाचा अवलंब केला, जे पाहता अनेकांनीच हे क्षण टीपण्यास सुरुवात केली. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेनंही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.





Rahul Gandhi at Kerala : मासेमारीसाठी थेट पाण्यातच उतरले राहुल गांधी!


दरम्यान, विद्यार्थ्यांशी एकरुप होणाऱ्या राहुल गांधी यांनी यापूर्वी विरोधकांवर निशाणाही साधला. सत्ताधारी भाजप आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या पक्षांवर त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं. तामिळनाडूमध्ये त्याच व्यक्तीचं राज्य असेल जो खऱ्या अर्थानं तामिळ संस्कृती आणि तामिळ भाषियांचं प्रतिनिधीत्त्वं करत असेल. राहुल गांधी हे या भागात तीन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आरएसएसवरही नाराजीचा सूर आळवण्यात येत आहे.