नवी दिल्ली : बुद्धीचा कस पाहणाऱ्या परीक्षांमधील एक परीक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूएपीएससी. या यूपीएससी परीक्षेत टीना दाबी ही तरुणी देशात पहिली आली. विशेष म्हणजे आपल्या पहिल्याच प्रयत्नात टीना दाबी या 22 वर्षीय तरुणीने यश मिळवलं.
टीना दाबीशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टीनाने आरक्षाणाचा फायदा घेत यश संपादन केल्याचं या फोटोमधून सांगितलं जातं आहे. शिवाय, टीनापेक्षा 35 गुण जास्त मिळवलेल्या अंकित अनुत्तीर्ण झाल्याचं फोटोमधून दाखवण्यात आलं आहे. या फोटोमागील सत्य काय आहे?
अवघ्या 22 व्या वर्षी टीना दाबीने केंद्री लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावत यश संपदीत केलं असून, अशाप्रकारचं यश संपादन करणारी टीना ही पहिली दलित विद्यार्थिनी आहे. टीनाचं हे यश नक्कीच ऐतिहासिक आहे. मात्र, सोशल मीडियावर सध्या टीनाच्या यशासंबंधित गोंधळ आणि गैरसमज निर्माण करणारे फोटो व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये अंकित श्रीवास्तव आणि टीना दाबी यांची प्रीलिमची मार्कशीट दाखवण्यात आली आहे. अंकितला टीनापेक्षा अधिक गुण असूनही, त्याला अनुत्तीर्ण दाखवलं गेलं आहे. कारण त्याला आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही, असा दावा या व्हायरल होणाऱ्या फोटोमधून करण्यात आला आहे.
या फोटोवरील मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “टॉपरपेक्षा 35 गुण जास्त, तरीही अंकित श्रीवास्तव फेल? या अन्यायाला जबाबदार कोण?”
पहिलं मार्कशीट अंकितचं आहे, ज्यामध्ये पेपर-1 आणि पेपर-2 या दोन्हींचे गुण मिळवून 230 होतात आणि त्याखाली लिहिलं आहे की, ‘नॉट क्वालिफाईड’.
दुसरं मार्कशीट टीना दाबीचं आहे, ज्यामध्ये पेपर-1 आणि पेपर-2 या दोन्हींचे गुण मिळवून 195 होतात आणि त्याखाली सिव्हिल सर्व्हिसेच्या मेन परीक्षेसाठी क्वालिफाईड असल्याचं म्हटलं आहे.
या दोन्ही मार्कशिट अंकित श्रीवास्तवने सर्वात आधी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केल्या होत्या आणि लिहिलं होतं, “आरक्षण व्यवस्थेचा महिमा किती आश्चर्यकारक आहे, याची आज जाणीव झाली.”
अंकितने असंही म्हटलं आहे की, “टीनाच्या प्रयत्नांचा आदर करतो. मात्र, एक प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे, माझ्यासारखे शेकडो जण आपलं पूर्ण आयुष्य यूपीएससीसाठी घालवतात. शिवाय, मोठ-मोठ्या दोन नोकऱ्यांना ठोकर मारुन रोज 12 ते 14 तास केवळ अभ्यास करतात, मात्र, असे विद्यार्थी कुठला अन्याय सहन करत आहेत? आरक्षणाचा पुनर्विचार करुन, सध्याच्या घडीला अनुसरुन आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाशी संबंध ठेवून आरक्षणाची मांडणी करण्याचं धाडस कुणी दाखवणार आहे का?”
अंकितच्या या पोस्टनंतर हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, एबीपी न्यूजच्या शेकडो वाचक-प्रेक्षकांनी या फोटोमागील सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
एबीपी न्यूजने जेव्हा या व्हायरल फोटोची सत्यता पडताळली, तेव्हा सत्य समोर आलं. मार्कशीटमध्ये टीना आणि अंकितचे जे गुण दाखवण्यात आले आहेत, ते खरे आहेत. टीनाला आरक्षणाचा फायदा मिळाला, हेही खरं आहे. मात्र, टीनाने यात कुठलंही बेकायदेशीर काम केलं नाही. तिला घटनेनं दिलेल्या अधिकाराचा लाभ घेतला आहे.
केंद्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तीन भागात होते. पहिली- पूर्व परीक्षा, दुसरी- मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत होते.
टीनाला पूर्व परीक्षेत आरक्षणाचा फायदा जरुर मिळाला. मात्र, यूपीएससी परीक्षेत टीनाने आपल्या मेहनतीवर आणि तिच्या कर्तृत्त्वावर यश मिळवलं आहे. मुख्य परीक्षेत टीना दाबीला कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही किंवा तिने घेतलेला नाही. शिवाय, टीनाने जनरल कॅटेगरीतून यूपीएससीचं यश संपादन केलं आहे, हे विशेष.
टीनाला यूपीएससी परीक्षेत 52 टक्के मिळाले आहेत. टीनाने 2025 गुणांपैकी 1063 गुण मिळवले असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अतहर आमिर आणि टीनाच्या गुणांमध्ये तब्बल 45 गुणांचा फरक आहे. मात्र, अतहर आणि तिसऱ्या क्रमांकावरील जसमित सिंह यांच्यामधील गुणांमध्ये केवळ 4 गुणांचा फरक आहे. अतहरला 1018 गुण, तर जसमितला 1014 गुण मिळाले आहेत. त्यामुळे टीनाच्या जवळपासही कुणी नाही.
त्यामुळे टीनाने आरक्षणाचा फायदा घेत यूपीएससीमध्ये यश मिळवलं आहे, असे म्हणणे अत्यंत चूक आहे. टीना आपल्या मेहनतीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर टॉपर बनली आहे. एबीपी न्यूजच्या पडताळणीनंतर व्हायरल होणारे हे फोटो चुकीचा मेसेज पोहोचवत असल्यातचं समोर आलं आहे.