नवी दिल्ली: एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोरच्या फक्त मुलींच्या तुकडीने यावर्षी माऊंट एव्हरेस्ट सर केलंय. एनसीसीच्या या फक्त मुलींच्या तुकडीमध्ये देशभरातील मुलींचा समावेश आहे.
9 मार्च 2016 रोजी मुलींच्या एनसीसी टीमने एव्हरेस्ट चढाईला सुरूवात केली. संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी या तुकडीला रवाना केलं. त्यानंतर 21 एप्रिल 2016 म्हणजे एक महिना आणि बारा दिवसांच्या चढाईनंतर ही तुकडी एव्हरेस्टच्या नेपाळमधील बेस कँपवर पोहोचली. त्यानंतर काल या तुकडीने जगातील सर्वोच्च पर्वत शिखर असलेलं माऊंट एव्हरेस्ट सर केलं.
एव्हरेस्ट सर करणाऱ्या या फक्त मुलींच्या एनसीसी टीममध्ये एकूण दहा मुलींचा समावेश करण्यात आला होता. त्यासोबतच पंधरा अन्य अधिकारीही या तुकडीसमवेत होते. कर्नल गौरव कार्की यांनी या तुकडीचं नेतृत्व केलं.
एनसीसीच्या या तुकडीने गेल्यावर्षी एप्रिल-मे पासूनच एव्हरेस्ट चढाईची तयारी सुरू केली. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून त्यांनी हिमाचल प्रदेशातील 19688 फुटांवरील देव टिब्बा हे शिखर सर केलं. या सराव चढाईमध्ये 40 कॅडेट्स सहभागी झाले होते. या देव टिब्बा शिखराच्या चढाईनंतर अंतिम तुकडीत 15 जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर दुसरा सराव 23360 फुटांवरील मांऊंट त्रिशुलवर चढाई करण्यात आली. या सराव चढाईनंतर अंतिम फेरीसाठी 10 जणींची निवड करण्यात आली. एव्हरेस्टवरील थंडीची सवय होण्यासाठी या मुलींना सियाचीन ग्लेसियरमध्ये तब्बल महिन्याभराचा सराव देण्यात आला.