नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ विराजमान झाले. त्याचवेळी सोशल मीडियावर आदित्यनाथांविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. आदित्यनाथ आणि मुलायम सिंह यादव यांच्यामध्ये नातं असल्याचे दावे केले जात आहेत. 'एबीपी न्यूज'ने यामागील व्हायरल सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे.


आदित्यनाथ हे मुलायम सिंह यादव यांच्या मोठ्या सूनबाई डिंपल यादव आणि धाकट्या सूनबाई अपर्णा यादव यांच्या नात्यात असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. म्हणजेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मेहुणे असल्याचं व्हायरल झालं आहे.

काय आहे व्हायरल मेसेज?

'मुलायम सिंह यादव यांच्या दोन्ही सुना डिंपल आणि अपर्णा या ठाकूर कुटुंबातील आहेत. मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांच्या आत्याचा मुलगा म्हणजे अजय सिंह बिश्त. अजय सिंह बिश्त यांना योगी आदित्यनाथ म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे आदित्यनाथ हे अखिलेश यांचे मेहुणे लागतात. योगी हे पौडी गढवाल उत्तराखंडचे मूळ रहिवासी आहेत. आठ दिवस उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवाराचा शोध घेतल्यानंतरही भाजपला समाजवादी पक्षाशी संबंधितच व्यक्ती मिळाली. अभिनंदन' असा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे.

योगी आदित्यनाथ आणि मुलायम सिंह यांच्या कुटुंबात नातं असल्याचे दावे आश्चर्यचकित करणारे आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात दोघंही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तराखंडमधील पौडी गढवालमध्ये झाल्यामुळे अनेकांचा या मेसेजवर विश्वास बसत आहे. मुलायम यांच्या दोन्ही सुनांचेही उत्तराखंडशी संबंध आहेत. मात्र या व्यतिरिक्त दोघांमध्ये कोणते संबंध आहेत का, हे पाहण्यासाठी एबीपी न्यूजने व्हायरल मेसेजची पडताळणी केली.

एबीपी न्यूजने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजची तपासणी करण्यासाठी थेट योगी आदित्यनाथ यांचंच घर गाठलं. या मेसेजमध्ये काही तथ्य आहे का, हा प्रश्न योगी आदित्यनाथ यांच्या आई-वडिलांना विचारला असता, त्यांनी तो साफ धुडकावून लावला. त्यामुळे साहजिकच योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यांच्यात नातं असल्याबाबत व्हायरल झालेला मेसेज सत्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.