या व्हिडीओमधील व्यक्ती 'बाबाजी भूत' या नावानं प्रसिद्ध असून, उत्तर प्रदेशमधील चंदौलीमध्ये भूतबाधा घालवण्याचं काम करतात. विशेष म्हणजे, या बाबांचे भक्त केवळ भारतातच मर्यादीत नसून, परदेशातील लोकांची भूतबाधा घालवत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे या मागची सत्यता पडताळण्यासाठी एबीपी न्यूजने सर्वात पहिला या बाबाजींचा इंटरनेटवरुन शोध घेतला, तेव्हा babajibhoot.com या वेबसाईटवरुन बाबाजींची माहिती मिळाली. त्या वेबसाईटवरुन हे बाबाजी सर्वसामान्यांची मदत करत असून, भोंदू बाबाकडून होणाऱ्या फसवणुकीतून सुटका करत असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, बाबाजी स्काइप, फेसबुक, गूगल प्लस अशा सोशल मीडियावरुनही लोकांची मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भूतबाधेसंदर्भातील लक्षणे त्यांनी या वेबसाईटवर सांगितली आहेत. या वेबसाईटच्या शेवटी भूतबाधा घालवणाऱ्या टीमचा फोटोही दिला आहे.
एबीपी न्यूजच्या टीमने शोध घेण्यासाठी वाराणसी गाठले. तेव्हा ते वाराणसीमधून तब्बल 40 किमी दूर चंदौलीमध्ये राहात असल्याचं समजलं. तसेच या बाबाजींचं नाव मोहम्मद आजम उर्फ लिंबूवाले बाबा असल्याचेही काही जणांनी सांगितलं. या लिंबूवाले बाबाजीच्या नावाचं कारणही मजेशीर सांगण्यात येत होतं. कारण हे बाबा लिंबूने भूतबाधा उतरवत असल्याने साऱ्या पंचक्रोशीत त्यांना लिंबूवाले बाबा म्हणून ओळखले जातात. हे बाबाजी भूतबाधा घालवण्यासाठी 50 लिंबू वापरतात. अन् भूतबाधा उतरवण्याची प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व लिंबू एका भट्टीत टाकून जाळले जातात.
बाबाजींची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजच्या टीमने बाबाजींना त्यांच्या आश्रमात गाठलं. पण तिथे कॅमेराला प्रतिबंध असल्याने, आश्रम प्रशासनाने कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाकारली. यानंतर दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर आश्रम प्रशासनाने कॅमेरा घेऊन आश्रमात प्रवेश करण्यास परवानगी दिली. एबीपी न्यूजच्या टीमने कॅमेरासोबत आश्रमात प्रवेश केला, त्यावेळी त्या आश्रमात बाबांभोवती त्यांच्या भक्तांचा गराडा होता. तर दुसरीकडे आश्रमात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची नोंदणी केली जात होती. तर सुरक्षेसाठी आश्रमात एकूण 12 सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले होते.
एबीपी न्यूजच्या टीमने बाबांजींशी चर्चा केली, आणि हे सर्व ते कसं करतात? याविषयी विचारले. तसेच त्यांच्या भक्तांसोबतही चर्चा केली, तेव्हा अनेकांनी आपले अनुभव कथन केले. यातील हैदराबादमधील एक भक्त शरीफ यांनी आपण सहावेळा बाबांच्या दर्शनाला असल्याचं सांगितलं. यासाठी त्यांनी 30 हजार रुपये खर्च केले. तसेच अजूनही आठ हजार रुपये दिले. पण अजून त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले नसल्याचं त्यांनी सांगितलं.
तर काही भक्तांनी बाबांजींनी सांगितलेल्या उपायांचा गुण आल्याचे सांगितले. यातीलच एक म्हणजे, लखनऊ सचिवालयातील एका वरिष्ठ अधिकारी सत्य प्रकाश कश्यप. कश्यप यांनी बाबजींनी आपल्या कुटुंबियांची भूतबाधा घालवल्याचा दावा केला. तर ऑस्ट्रेलियाहून आलेल्या नरेंद्र कुमार यांनीही बाबाजींच्या भूतबाधा उतरवण्याच्या उपायांचा गुण आला असल्याचं सांगितलं.
बाबाजींच्या मते, अनेकांना तर 15 भूतांची बाधा झाली असते. ते उतरवण्यासाठी प्रत्येकी 250 रुपये खर्च करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितलं. पण भक्तांची सखोल चौकशी केल्याव, कोणत्याही व्यक्तीला भूतबाध झालेली नसल्याचे समजले. पण बाबाजी भूत हे प्रत्येक भूतबाधा घालवण्यासाठी प्रत्येकी 250 रुपयाच्या हिशेबाप्रमाणे मोठी माया गोळा करत असल्याचे दिसून येत होते.
भूतबाधा उतरवण्यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पातालपुरी मठाचे महंत बाबा बालक दास यांच्याशी एबीपी न्यूज टीमने संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी हे सर्व खोटं असल्याचं सांगितलं. ''लिंबूने कधीही भूतबाधा घालवता येत नाही. तसेच भूतबाधा फक्त आध्यात्मिक कार्यक्रम, भजन, साधू-संन्याशांच्या सानिध्यात उतरवली जात असल्याचा,'' दावा बाबा बालक दास यांनी केला. म्हणजे, धर्माचे ठेकेदार एकीकडे भूताचं अस्तित्व मान्य करतात. पण दुसरीकडे बाबाजी भूतच्या पद्धतीवरुन फारकत घेतात.
यावर मनसोपचार तज्ज्ञांची मते जाणून घेतली तेव्हा हा एक मानसिक रोग असल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं, आणि हा आजार बरा केला जाऊ शकतो असेही स्पष्ट केले. त्यामुळे असे मानसिक आजार बरे करण्यसाठी कोणत्याही बाबाची गरज नसते. एबीपी न्यूजच्या पडताळणीत या बाबाजीचा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.