मुंबई : देशात 9 राज्यातील 10 विधानसभेच्या जागा आणि एका लोकसभेच्या जागेसाठी मतदान पार पडलं. श्रीनगरमध्ये मतदानावेळी झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

श्रीनगरमध्ये केवळ 7.14 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही आतापर्यंतची श्रीनगरमधील सर्वात कमी टक्केवारी आहे. यापूर्वी इथे मतदानावेळी कधीच मतदानावेळी हिंसा झाली नव्हती.

श्रीनगरमध्ये एकूण 12 लाख 61 हजार मतदार आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी इथे 26 टक्के मतदान झालं होतं. यापूर्वी या लोकसभेच्या जागेसाठी सर्वात कमी 11.93 टक्के मतदान 1999 साली झालं होतं. त्यावेळी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विद्यमान मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा पराभव केला होता.

श्रीनगरच्या लोकसभा क्षेत्रातील विविध भागात जाळपोळ करण्यात आली. तर दोन मतदान केंद्रावर आग लावण्यात आली. पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्या चकमकीत सात जणांचा मृत्यू झाला.

श्रीनगरशिवाय मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, दिल्ली, आसाम आणि झारखंडमध्येही विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. मध्य प्रदेशात एका ठिकाणी मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं.