VIjay Shah: ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून बोलताना कर्नल सोफिया कुरेशींबाबत चीड आणणारं वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांच्यावर जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला आता भाजप मंत्र्याने आव्हान दिलं आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांना लक्ष्य करणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल FIR नोंदवण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शहा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नक्की प्रकरण काय?
ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून बोलताना मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला होता. मध्यप्रदेशमधील एका कार्यक्रमात बोलताना अतिरेक्यांची बहीण असा उल्लेख केल्याने मोठा गदारोळ सुरू झाला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधानांनी मंत्री विजय शहांची हकलपट्टी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली.
दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याची जबलपूर उच्च न्यायालयाने दखल घेत मंत्री विजय शहांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले होते. सगळीकडून टीका झाल्यानंतर भाजप मंत्री विजय शहा यांनी आपल्या वक्तव्याबाबत लाज वाटत असल्याचं सांगत माफी मागितली . सोशल मीडियावर तसा व्हिडिओही त्यांनी टाकला होता . दरम्यान, आता भाजपमंत्र्यानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
काँग्रेसने पुतळा जाळला
दरम्यान, कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानावर संताप व्यक्त करत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी (14 मे) इंदूरमध्ये मंत्री विजय शाह यांचा पुतळा जाळला. शहरातील रिगल चौकात काँग्रेस महिला मोर्चाच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनादरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे आदिवासी व्यवहार मंत्री शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी त्यांचा राजीनामाही मागितला.
विजय शाह काय म्हणाले होते?
भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं."त्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल", असं विजय शाह म्हणाले होते.
हेही वाचा:
चीन-अमेरिकेने टाकला डाव; नेमकं चाललंय काय? भारतावर होऊ शकतो थेट परिणाम