विजय मल्ल्यांवर विविध बँकांचं 9000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. मात्र हे कर्ज बुडवून ते परदेशात पळाले आहेत. मद्यकिंग विजय मल्ल्या अब्जाधीश होते. मात्र तरीही राज्यसभेचे खासदार म्हणून ते सरकारी भत्ते घेत होते. इतकंच नाही तर टेलीफोनपासून परदेशवारीपर्यंत त्यांनी सरकारी पैशांचा वापर अक्षरश: पाण्यासारखा केला.
माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते मोहम्मद खालिद जीलानी यांनी राज्यसभा सचिवालयाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी माहिती मिळवण्यासाठी पत्र लिहिला होता. यावर केंद्रीय जनसंपर्क अधिकारी अरुण शर्मा यांनी उत्तर पाठवलं. राज्यसभेचे खासदार असताना विजय मल्ल्यांनी सचिवालयापासून हवाई प्रवासाचा भत्ता घेतला. तसंच अनेक फायदे आणि भत्तेही घेतले, असं उत्तरात म्हटलं आहे.
विजय मल्ल्यांनी घेतलेले भत्ते
विजय मल्ल्यांचा राज्यसभेतील मासिक वेतन - 50 हजार रुपये.
मतदारसंघाचा भत्ता (1 ऑगस्ट 2010 ते 30 सप्टेंबर 2010) - 20000 रुपये
त्यानंतर हाच भत्ता महिन्याला वाढवून 45000 रुपयांपर्यंत पोहोचला
ऑफिस भत्ता जुलै ते सप्टेंबर महिन्याला 6000 रुपये
त्यानंतर हाच भत्ता महिन्याला 15000 रुपये
टेलीफोन बिल 1 लाख 73 हजार 271 रुपये
इंग्लंडमध्ये ऐशोआरामात वास्तव्य
देशातील विविध बँकाचं कोट्यवधीचं कर्ज बुडवून परदेशात विजय मल्ल्या ऐशोआरामात राहत आहे. 17 बँकांचं 9000 कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी मल्ल्यांनी हात वर केले. पण मल्ल्या सध्या इंग्लडच्या हर्टफोर्डशायर कौंटीमधील 1.5 कोटी डॉलरच्या बंगल्यात राहत आहेत.
संडे टाइम्सच्या वृत्तानुसार, हा बंगला फॉर्मुला वन चॅम्पियन लेविस हॅमिल्टनच्या वडिलांनी एका परदेशी कंपनीकडून खरेदी केला होता.