चेन्नई : भाजपप्रणित एनडीएनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर जेपी नड्डा यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूमधील आहेत. त्यांना उपराष्ट्रपती केल्याचा भाजपला तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो, अशा चर्चा सुरु आहेत. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. द्रमुकचे वरिष्ठ नेते टी.के.एस. इलानगोवन यांनी म्हटलं की सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार केल्याचा तामिळनाडूला काही फायदा होणार नाही.

Continues below advertisement


सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्रमुकनं का द्यावा असा सवाल देखील माजी राज्यसभा खासदार इलानगोवन यांनी केला आहे. आमचा पक्ष इंडिया आघाडीच्या निर्णयाचं पालन करेल, आमचा पक्ष यामध्ये प्रमुख सहयोगी आहे, असंही इलनागोवन म्हणाले. राधाकृष्णन यांना मिळालेली उमेदवारी ही त्यांच्यासाठी प्रमोशन आहे, मात्र, यामुळं तामिळनाडूचं काही भलं होणार नाही, असंही इलानगोवन  यांनी म्हटलं.  


केंद्रातील भाजप सरकारनं तामिळनाडूचा प्रत्येक मार्गानं अपमान केल्याचा आरोप इलानगोवन यांनी केला आहे. तामिळनाडूमध्ये मार्च एप्रिल 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत अशावेळी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप नेतृत्त्वानं तामिळन व्यक्तीचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केलं आहे कारण तामिळनाडूसाठी चांगलं काम केलं हे सांगता यावं हा त्यांचा प्रयत्न आहे.  


सीपी राधाकृष्णन कोण आहेत?


सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून 31 जुलै 2024 पासून कार्यरत होते. त्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते. त्यावेळी त्यांच्याकडे तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार होता, पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. सीपी राधाकृष्णन यापूर्वी भाजपचे 2003 ते 2006 य कालावधीत तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते. राधाकृष्णन 1998 आणि 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोइंबतूर मधून विजय झाले होते.


भाजपचे बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न


भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक काल पार पडल्यानंतर जे.पी. नड्डा यांनी सीपी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर जे.पी. नड्डा यांनी उपराष्ट्रपती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते विरोधकांशी चर्चा करत आहेत, असं म्हटलं. यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना फोन केला होता.