मालपे/ गोवा : मालपे-विर्नोडा या भागात अनेक वर्ष पडून असलेल्या वाहनांना भीषण आग लागली आहे. गोवा पर्यटन खात्याचं हॉटेल आणि रेस्टहाऊस नजीक ही वाहनं पडलेली होती. ज्यात 17 स्कूटर आणि सात महिंद्रा जीपचा समावेश आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.


मालपे-कोलवाळ मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जोरात सुरु असून, डांबरीकरणामुळे या कामासाठी लागणारी लाकडे रस्त्यालगत टाकली होती. या लाकडांना अज्ञाताने आग लावली. ही आग सुक्या गवताच्या साहाय्याने पुढे सरकत सरकत गोवा पर्यटन खात्याच्या जागेपर्यंत पोहोचली.

या जागेतील हॉटेल गोवा दरबार व गेस्ट हॉऊस गेली अनेक वर्षे बंद आहे. शिवाय, हॉटेलच्या बाजूलाच गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठी जीप, समुद्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्कूटर ठेवण्यात आल्या होत्या. पण आगीने रौद्ररुप धारण केल्याने ही सर्व वाहने जळून खाक झाली. सुमारे तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

दरम्यान, या आग्नितांडवातून 5 मोठ्या बोटी आणि 20 जीपसह 50 लाखांची मालमत्ता वाचविण्यात अग्नाशामक दलाच्या जवानांना यश आलं आहे.