Vande Bharat Express Train: नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची चाचणी पूर्ण झाली आहे. ही देशातील तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express Train) आहे. या नवीन ट्रेनने वेगाच्या बाबतीत बुलेट ट्रेनलाही (Bullet Train) मागे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणारी ट्रेन आता लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे, असे अनेक प्रवाशांना वाटत आहे.
बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड मोडला
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वंदे भारत ट्रेनने चाचणी दरम्यान अवघ्या 52 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग पकडला आहे. इतका कमी वेळात हा वेग पकडून वंदे भारतने बुलेट ट्रेनचा रेकॉर्डही मोडला आहे. हा वेग गाठण्यासाठी बुलेट ट्रेनला 54.6 सेकंद लागतात. नवीन ट्रेनचा कमाल वेग 180 किमी प्रतितास आहे. जुन्या वंदे भारत एक्स्प्रेसचा कमाल वेग ताशी 160 किलोमीटर आहे.
या चाचणीचा व्हिडीओ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, ''वंदे भारत एक्स्प्रेस - 'मेक इन इंडिया' या व्हिजनचा गौरव आहे. ही ट्रेन अहमदाबाद-मुंबई दरम्यानच्या ट्रॅकवर धावत आहे.''
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेने ऑगस्ट 2023 पर्यंत अशा 75 गाड्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष ठेवले आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावू शकते. या महिन्यात अधिकृतपणे या ट्रेनच्या फेऱ्या सुरू होईल. शुक्रवारी अहमदाबाद-मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली. अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल हे 491 किमी अंतर कापण्यासाठी ट्रेनला 5 तास 10 मिनिटे लागली. अहमदाबादहून मुंबई सेंट्रलला पोहोचण्यासाठी शताब्दी एक्स्प्रेसला 6 तास 20 मिनिटे लागतात. ही ट्रेन अहमदाबादहून सकाळी 7.06 वाजता निघून फक्त 2 तास 32 मिनिटांत सुरतला पोहोचते. तर शताब्दी एक्स्प्रेसला यासाठी तीन तास लागतात.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, नवीन ट्रेन 130 सेकंदात 160 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. तर जुन्या ट्रेनला हा वेग गाठण्यासाठी 146 सेकंदांचा कालावधी लागला. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनचे नियमित उत्पादन ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट असून दर महिन्याला दोन ते तीन गाड्या तयार केल्या जातील. ज्याची संख्या येत्या महिन्यात 5 ते 8 करण्यात येईल. या नवीन ट्रेनने सर्व चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि व्यावसायिकरित्या धावण्यासाठी सज्ज आहे.