उदयपूर, राजस्थान : उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा (Udaipur-Jaipur Vande Bharat Express ) मोठा घातपात टळला आहे. लोको पायलटने दाखवलेल्या प्रसंगावाधानामुळे सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली. उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात घडवण्याच्या उद्देशाने ट्रॅकवर दगड-धोंडे ठेवले होते. अख्खी ट्रेन ट्रॅकवरुन उलटवण्याचा कट होता. मात्र लोकोपायलटच्या चाणाक्षपणामुळे मोठी दुर्घटना टळली. 


उदयपूर- जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोको पायलटला रेल्वे रुळावर मोठी दगडे आणि इतर गोष्टी दिसल्यानंतर त्याने तातडीने रेल्वे थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या घटनेची माहिती जीरआरपीला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 


लोको पायलटने वाचवले प्रवाशांचे प्राण 


उदयपूर ते जयपूर दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन सोमवारी चित्तोडगड जिल्ह्यातील सोनियाना गांगरार येथे पोहोचली. तेव्हा लोको पायलटला ट्रॅकवर दगड दिसले. दगड पाहिल्यानंतर पायलटने ट्रेनचे ब्रेक लावले. यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकावर याबाबत माहिती दिली. समाजकंटकांनी रुळांवर मोठमोठे दगड, बार टाकले होते. गाडी वेळेत थांबवली नसती तर रुळावरून घसरण्याची शक्यता होती. या अपघातामागे कोणाचे षडयंत्र आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.






या मार्गावर आधीदेखील झाली होती दगडफेक 


उदयपूर ते जयपूर दरम्यान धावणारी तिसरी वंदे भारत ट्रेन सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी रेल्वेवर दगडफेक करून डब्याच्या काचा फोडण्यात आल्या. या दगडफेकीच्या घटनेनंतर चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरारा पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, काही राज्यांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्याचे प्रकार घडले होते. मात्र, आज राजस्थानमध्ये समोर आलेला प्रकार चिंताजनक आहे. याची दखल गांभीर्याने घेतली गेली असून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. 


उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस ही मंगळवार वगळता आठवड्यातील इतर सहा दिवस धावते. उदयपूरहून सकाळी 7.50 वाजता 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुटते आणि जयपूर येथे दुपारी 2.05 वाजता  पोहचते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :