रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील पर्वतरागांमध्ये असणाऱ्या जगप्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिराती कवाडं सहा महिन्याच्या शीतकालीन कालावधीनंतर सोमवारी पहाटे 5 वाजता उघडली. या क्षणाचं औचित्य साधत मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराला सजावट करण्यासाठी तब्बल 11 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला. मागील वर्षीप्रमाणंच यंदाही कोरोनाचं संकट अधिक बळावल्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आलेला नाही. 


उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. 'संपूर्ण जगात 11 वं ज्योतिर्लिंग म्हणून ख्याती असणाऱ्या भगवान केदारनाथांच्या मंदिराची कवाडं सोमवारी पहाटे 5 वाजता परंपरागत पूजा- अर्चा पार पडण्यानंतर खोलण्यात आली. मेष लग्नाच्या शुभमुहूर्तावर हा विधी पार पडला. मी बाबा केदारनाथ यांच्याकडे सर्वांनाच निरोगी ठेवण्याची प्रार्थना करतो', असं ट्विट त्यांनी केलं. 


मंदिरात भाविकांसाठी प्रवेश निषिद्ध असला तरीही, भाविकांनी घरुनच केदारनाथाला श्रद्दासुमनं अर्पण करावील असं आवाहनही त्यांनी केलं. सोबतच मंदिरात दररोज श्री भीमाशंकर लिंगम् यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित दैनंदिन पूजा- अर्चा करतील अशी माहितीही त्यांनी दिली.










चारधाम यात्रेवर कोरोनाचं सावट 


यंदाच्या वर्षीही चारधाम यात्रेवर कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. 18 मे रोजी बद्रीनाथ मंदिराचीही कवाडं परंपरागत तिथीप्रमाणं खुली होणार आहेत. पहाटे सव्वाचार वाजताच्या ब्रह्ममुहूर्तावर ही कवाडं खुली होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथेही भाविकांना मनाई असली तरीही पुरोहित आणि मंदिर न्यास समितीतील 25 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यापूर्वी 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे यमुमोत्री आणि गंगोत्री मंदिराची कवाडं खोलण्यात आली होती.