Uttarkashi Rescue Operation: उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तर काशीमध्ये (Uttarkashi) 41 जणांना वाचवण्यासाठी सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, बोगदा खोदणाऱ्या अमेरिकन ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीहून हेलिकॉप्टरद्वारे 7 तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे. काही तांत्रिक बिघाड दूर करुन कोणत्याही परिस्थिती आजच बचावकार्य पूर्ण केलं जाईल, असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
आज कोणत्याही क्षणी उत्तराखंडच्या उत्तर काशी येथील निर्माणधीन बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. बोगद्यात अडकलेले मजूर बाहेर येताच, सर्वात आधी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर उर्वरित प्रक्रिया केली जाईल. याच पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली असून डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम बुधवारी अंतिम टप्प्यात पोहोचलं. अडकलेल्या कामगारांपासून प्रशासन काहीच अंतर दूर आहे.
दरम्यान, 12 नोव्हेंबरपासून येथील बोगद्यात कामगार अडकले आहेत. बचाव कर्मचार्यांनी ढिगाऱ्यांमध्ये 45 मीटर रुंद पाईप यशस्वीरित्या टाकले आहेत. आता फक्त काही मीटरचे आच्छादन उरलं आहे. त्यानंतर बचाव पथक बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना पाईपद्वारे बाहेर काढतील. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव कर्मचार्यांना एकूण 57 मीटर ड्रिल करावं लागेल. ढिगाऱ्यात 39 मीटरपर्यंत स्टीलचे पाईप टाकण्यात आले आहेत.
बचाव कार्य अंतिम टप्प्यात, मात्र अचानक तांत्रिक बिघाड
बुधवारी संध्याकाळी उशिरा स्टील पाईपच्या ड्रिलिंगमध्ये अडथळे आले. काही लोखंडाच्या काही सळया ऑगर मशीनमध्ये आल्या. मात्र, गुरुवारी बचावकार्य पूर्ण होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे. बचाव कार्य पथकातील एक सदस्य गिरीश सिंह रावत यांनी सांगितलं की, "बचाव कार्य जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे. एक ते दोन तासांत निकाल येईल, अशी आशा आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाईपलाईन टाकल्या जात आहेत. भंगारात अडकलेले स्टीलचे तुकडे कापून काढण्यात आले आहेत. दिल्लीतील एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बोगद्याच्या कोसळलेल्या भागाच्या ढिगाऱ्यात 44 मीटर लांबीचा 'एस्केप' पाईप टाकण्यात आला होता.