देहराडून : गावातील लहान मुलावर बिबट्याने हल्ला केल्याच्या कारणातून ग्रामस्थांनी जंगलंच पेटवून दिलं आहे. उत्तराखंडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.


उत्तराखंडमधील बागेश्वर गावातील एका 8 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला, ज्यात चिमुकल्याला आपला जीव गमावावा लागला. चिडलेल्या ग्रामस्थांनी बिबट्याला संपवण्यासाठी गावाशेजारील जंगलच पेटवलं.

सोमवारी संध्याकाळी नैसर्गिक विधी करण्यासाठी हा मुलगा घराशेजारी गेला होता. चिमुकल्याची आई स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. याचवेळी बिबट्याने लहानग्यावर हल्ला केला आणि त्याला जंगलात ओढून नेलं. गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्य़ंत मुलाचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी  सकाळी त्याचं अर्थं खाल्लेलं शरीर सापडलं.

चिडलेल्या 4 ते 5 हजार ग्रामस्थांनी आठ एकरावरील जंगलालाच पेटवलं. आग विझवण्यासाठी कुणाला प्रयत्न करताही आले नाहीत कारण ग्रामस्थांनी बाहेरच्यांना गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला.

याच बिबट्याने मार्च महिन्यात चार वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला. तीन महिन्यातील सलग दुसरी घटना असल्यामुळे ग्रामस्थांनी जंगलालाच आग लावली.

दरम्यान या बिबट्याला वनविभागाने नरभक्षक घोषित केलं असून त्याला ठार मारण्यासाठी आदेशही देण्यात आले आहेत.