Uttarkashi Bus Accident Video : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये रविवारी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमधील सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील होते. या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बस दरीत कोसळलेली दिसत आहे.
खड्ड्यात पडलेल्या बसचा चक्काचूर
उत्तरकाशीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी माहिती दिली की, बसमधील सर्व भाविक यमुनोत्री धामच्या दर्शनासाठी जात होते. हे भाविक मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (SDRF) घटनास्थळी पोहोचले. यांनतर युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य राबवण्यात आलं. अपघातानंतर खड्ड्यात पडलेल्या बसचा स्फोटही झाला. हे दृश्य इतकं भीषण होतं की, बघणाऱ्यांचं चित्त विचलित झालं.
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही जिल्हा प्रशासनाला पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. यमुनोत्री मार्गावरील बस अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी राज्य सचिवालयातील आपत्ती नियंत्रण कक्षात पोहोचून मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून नुकसान भरपाई जाहीर
मुख्यमंत्री धामी यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरूंच्या नातेवाईकांना एक लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकसान भरपाई जाहीर केली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या