Uttarakhand Landslide : उत्तराखंडमधील (Uttarakhand) रुद्रप्रयाग येथे झालेल्या भूस्खलनात (Landslide) आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या दुर्घटनेमध्ये अद्यापही 17 जण बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. केदारनाथपासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या घटनेमध्ये अनेक दुकानं आणि हॉटेल्सचे नुकसान झाले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी चार स्थानिक लोक आणि नेपाळी वंशाचे 16 लोक उपस्थित होते. 






सध्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (SDRF) शोध कार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच बचाव मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातील मोरी भागात अरकोट-चिनवा मोल्डीजवळ मोठ्या प्रमाणावर भूस्खलनामुळे सुमारे 50 ते 60 भाग कोसळला आहे. तसेच सध्या या भागातील अनेक गावांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील बरीच गावं विलग करण्यात आली आहेत. भूस्खलनामुळे या मार्गावर अनेक प्रवासी अडकले आहेत. 


उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस


सध्या उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शुक्रवारी (4 ऑगस्ट) रुद्रप्रयाग येथे मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा मार्गावरील गौरीकुंडजवळ भूस्खलनाची घटना घडली होती. या भूस्खलनामुळे तीन दुकानांचे नुकसान झाले होते. तर जवळपास 10 पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. 


उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच त्यांनी बचाव कार्याचा देखील घटनास्थळी जाऊन आढावा घेतला आहे. तर अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरु केलं असल्याचं म्हटलं आहे. तर अद्याप बेपत्ता असलेल्या नागरिकांमधून एकाचाही शोध लागला नसल्याचं सांगण्यात येत आहे. 


उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने भूस्खलनाच्या घटना सातत्याने घडत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये आलेल्या पर्यटकांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येत आहे. 


हेही वाचा : 


Kedarnath Mobile Ban : केदारनाथमध्ये मोबाईल बंदी, फोटो आणि रिल्स बनवणाऱ्यावरही कारवाई होणार