Uttarakhand Bus Accident: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. देहरादूनमधील (Dehradun)विकासनगरजवळ बुल्हाड बायला रोडवर एक बस दरीत कोसळली आहे. या दुर्घटनामध्ये एकाच गावातील 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु झाले आहेत. या बसमध्ये 25 जण प्रवास करत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून अपघात झाला. उपविभागीय अधिकारी, पोलिस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (Uttarakhand Accident) घटनास्थळी पोहोचलं असून बचाव कार्य सुरु केले आहे.


चकराता येथील एसडीएम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, 'पोलीस आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळावर पोहचली असून बचावकार्य सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतेय.' पंतप्रधान नरेंद्र मोदी या दुर्घटनाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक बचावकार्य करत आहेत. मृतांच्या आत्म्यांना ईश्वर शांती देवो, असं ट्विट मोदींच्या कार्यालयातून करण्यात आलं आहे.






या दुर्घटनेबाबात पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, या अपघातामागे ओव्हरलोडिंग  हे एक कारण असू शकतं. बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी होते. बस ज्या मार्गाने जात होती तेथून वाहनांची संख्या कमी असते. त्यामुळे या बसमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते.





उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. धामी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्विटमध्ये धामी म्हणतात, 'चकरातामध्ये बुल्हाड़-बायला मार्गवर झालेल्या अपघाताबद्दल खेद व्यक्त करत आहे. मृतांच्या आत्म्यांना ईश्वर शांती देवो, यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबियांना हे मोठं दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. जिल्हा प्रशासनाला बचावकार्य वेगानं करण्यासाठी आणि जखमींना तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.