पंढरपूर : देशातील जनता हुशार आहे. जनतेने इंदिरा गांधींसारख्या नेत्याला पराभव दाखवला, त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नये, अशा शब्दात विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधलं. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक शंकर आप्पा मंगळवेढेकर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त पंढरपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशातील 100 कोटी जनता हुशार आहे. त्यांनी इंदिरा गांधींनाही पराभूत केलं होतं. सत्तेचा रिमोट जनतेच्याच हातात असतो, त्यामुळे कोणत्याही नेत्याने जनता आपल्या खिशात आहे, या भ्रमात राहू नये असा सणसणीत टोला डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
मोदी यांच्या कारभाराविरोधात भाजपसोबतच हिंदू संघटनांमध्येही मोठी नाराजी असल्याचे तोगडिया यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत होतं. उत्तर प्रदेशच्या निवडणूक होईपर्यंत आपण शांत राहणार असून त्यानंतर मात्र आपण बोलणार असल्याचा इशारा तोगडियांनी दिला. राम मंदिर कधी बांधणार याची तारीख त्यांना विचारा, असा टोलाही त्यांनी लगावला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं तोगडियांनी कौतुक केलं. सत्तेवर येताच एका फटक्यात हजारो मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय घेतला. त्यांच्यापेक्षा आपल्या देशात या निर्णयाला नागरिकांचा अधिक पाठिंबा आहे. देशात बेकायदा राहणाऱ्या तीन कोटी बांग्लादेशींना हे सरकार बाहेर काढणार का असा सवालही तोगडियांनी पंतप्रधान मोदींना केला.
नुसती भाषणबाजी न करता अॅक्शन घ्यावी लागेल, असं केल्यास देशातील शंभर कोटी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील, मात्र राजकारण्यांना देशाची मानसिकताच समजात नसल्याचा टोला डॉ. तोगडिया यांनी लगावला.
राज्यात भाजप-शिवसेनेमध्ये झालेल्या काडीमोडाबाबत बोलताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समजूतदार असल्याचं सांगत ते योग्य निर्णय घेतील, असं तोगडियांनी सूचित केले. देशात काश्मीरपासून इतर कोणत्याही भागात शत्रूविरोधात ज्या पद्धतीची कठोर कारवाई गरजेची आहे, ती कुठेच होताना दिसत नसल्याचे डॉ. तोगडिया यांनी सांगितलं.