अलीगड : उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्याच्या हरदुआगंजमध्ये खेळाखेळात दुर्दैवी अपघात घडला. जटपुरा गावात गल्ली क्रिकेट खेळताना छातीवर चेंडू आदळल्याने 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आकाश असं मृत मुलाचं नाव आहे.

 

चौथीत शिकणारा आकाश घराशेजारीच क्रिकेट खेळत होता. मात्र यावेळी एक चेंडू त्याच्या छातीवर आदळला. यानंतर आकाश खाली कोसळला आणि त्याच मृत्यू झाला.

 

 

चेंडू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला दीनदयाळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र छातीला गंभीर दुखापत झाल्याचं सांगत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. तसंच शवविच्छेदन न करताच आकाशवर अंत्यसंस्कार केले.

 

 

हरदुआगंजमध्ये राहणाऱ्या राजीव आणि पुष्पा दाम्पत्याला दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यात आकाश सर्वात लहान मुलगा होता. जवळच्याच शाळेत तो चौथी इयत्तेत शिकत होता. शाळेला सुट्टी असल्याने आकाश नेहमीप्रमाणे गल्लीतील मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. त्याला क्रिकेटची प्रचंड आवड होती.

 

 

क्रिकेट खेळत असताना चेंडू थेट त्याच्या छातीवर आदळला. जबर फटका बसल्याने तो विव्हळला. त्यानंतर इतर मुलांनी त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. घरातील लोक आले आण त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.