बंगळुरु : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जिंकण्यसाठी घुबडाचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेलंगणाच्या सीमाभागावर असलेल्या कलबुर्गी जिल्हातील सेदाम तालुक्यातून पोलिसांनी घुबड तस्करी करणाऱ्या 6 जणांना ताब्यात घेतले होते. हे घुबड तेलंगणाच्या नेत्यांनी विरोधकाला पराभूत करण्यासाठी मागविल्याची माहिती तपासात मिळाल्याने खळबळ उडाली आहे.


सेदाममध्ये तस्करांकडून पकडण्यात आलेल्या घुबडाचा वापर काळी जादू करुन निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात येणार होता, अशी माहिती मिळली आहे. येत्या 7 डिसेंबर रोजी तेलंगणात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तसेच प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. मात्र प्रचाराव्यतिरिक्त निवडणूक जिंकण्यासाठी हा वेगळाच प्रकार अवलंबल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकमध्ये घुबड तस्करी करणाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. या घुबडांची किंमत लाखांच्या वर असते. तस्करांकडून तेलंगणात नेले जाणारे घुबड तीन ते चार लाख रुपयांपर्यंत विकले जाणार होते, अशी माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

घुबडाला इंग्लडमध्ये बुद्धीमत्तेचे प्रतिक तर भारतात अशुभ मानले जाते. भारतात काळ्या जादुच्या तंत्रासाठी घुबडाचा वापर केला जातो. घुबडांच्या माध्यमाने व्यक्तीला वश करता येते, अशी अंधश्रद्धा समाजात आहे. त्यामुळे घुबडाचा अशाप्रकारे वापर केला जात असल्याने तेलंगणाच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.