नवी दिल्ली : आयसिस या दहशतवादी संघटनेकडून भारतातील परदेशी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला जाण्याची शक्यता आहे. एनआयएमधील सुत्रांच्या माहितीनुसार नुकत्याच पकडलेल्या एका आयसिस संशयिताने या गोष्टीचा खुलासा केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या दुतावासानेही पर्यटकांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
काय आहे आयसिस संशयिताचा खुलासा?
आयसिस संशयिताच्या माहितीला भारतीय तपास संस्थांनी देखील दुजोरा दिला आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, इस्रायल या देशातील पर्यटक आयसिसचे लक्ष्य आहेत, अशी माहिती पकडण्यात आलेल्या मोहम्मद मसीउद्दीन उर्फ मूसा या संशयिताने दिली आहे.
दहशतवाद्यांनी कोलकात्याच्या मदर तेरेसा हाऊसचीही रेकी केल्याची माहिती मूसा या आयसिस संशयिताने दिली. तेथील पर्यटकांवर चाकूने हल्ला करण्याची योजना होती, असा खुलासा मूसा याने केला. नुकतेच तीन आयसिस संशयितांना पकडण्यात आले आहे.
आरएसएस, भाजप आणि विहिंप दहशतवाद्यांच्या रडारवर
भारतातील आयसिसचा प्रमुख शफी अरमार उर्फ युसूफ अल हिंदी भारतातील काही नेत्यांवर हल्ला करण्याचं नियोजन करत असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे.
युसूफ हा सीरियात बसून आयसिस समर्थकांना हल्ला करण्यासाठी तयार करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांवर हल्ला करण्याचे निर्देश युसूफने दिले असल्याचा खुलासाही मूसा याने केला. युसूफ हे सर्व निर्देश ऑनलाईन देत असल्याचीही माहिती मूसा या आयसिस संशयिताने दिली.
... अन्यथा भाजप, आरएसएस, विहिंपवर हल्ला करा : युसूफ
पर्यटकांवर हल्ला करणं शक्य नसेल तर भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करा, असे निर्देशही युसूफने दिले आहेत. युसूफच्या ऑनलाईन चॅटिंगमधून हा खुलासा झाला आहे.
युसूफ अल हिंदी उर्फ शफी अरमार सध्या सीरियामध्ये राहतो. तेथूनच भारतात आयसिसचे जाळे तयार करण्याचे काम युसूफकडून केले जाते. युसूफ भारतातील आयसिस समर्थकांशी टेलीग्राम या सोशल साईटवर 'Wind of Victory' या ग्रुपवरुन संपर्कात होता.