Bilateral Meeting With Joe Biden : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या (24 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी क्वाड समिटमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जपानमध्ये क्वाड नेत्यांची दुसरी ​​शिखर परिषद होत आहे. या परिषदेत चारही देशांच्या नेत्यांकडून विकासाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. क्वाड अंतर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची ही उत्तम संधी असल्याचे मोदी म्हणाले.


आम्ही, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील घडामोडी आणि परस्पर हिताच्या अनेक जागतिक मुद्यांवर देखील  व्यापक चर्चा करु असे मोदींनी म्हटले आहे. तसेच माझी अमेरिकेचे अध्यक्ष, जोसेफ बायडन यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठकही होणार आहे. या बैठकीत आम्ही, अमेरिकेसोबतच्या आमच्या बहुआयामी द्विपक्षीय संबंधाना अधिक दृढ आणि मजबूत करण्याविषयी चर्चा करु. तसेच, प्रादेशिक घडामोडी आणि सध्या सुरु असलेल्या जागतिक प्रश्नांवरची आमची चर्चाही आम्ही पुढे घेऊन जाऊ असे मोदींनी म्हटले आहे.



ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत करणार चर्चा


ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अॅंथनी अल्बानीस देखील पहिल्यांदाच क्वाड संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्याही सोबत द्वीपक्षीय बैठक करण्यास मी उत्सुक असून, सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुआयामी सहकार्य, तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर त्यांच्यासोबत या बैठकीत व्यापक चर्चा होणे अपेक्षित आहे.


जपानमधील उद्योजक-व्यवसाय प्रतिनिधींसोबत बैठक


भारत आणि जपान दरम्यानची वित्तीय भागीदारी हा देखील आमच्या विशेष राजनैतिक आणि जागतिक भागीदारीचा महत्वाचा पैलू आहे. मार्च महिन्यातील शिखर परिषदेत, पंतप्रधान कीशिदा आणि मी, येत्या पाच वर्षात, जपानमधून भारतातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत 5 ट्रिलियन येन (JPY) ची गुंतवणूक करण्याचा मानस असल्याची घोषणा केली होती. या आगामी भेटीत, मी जपानमधील उद्योजक-व्यवसाय प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन, या उद्दिष्टप्राप्तिसाठी दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. जपानमध्ये  सुमारे 40 हजार भारतीय लोक राहतात. हे सर्व भारतीय नागरिक, भारताच्या जपानसोबतच्या संबंधांचे वाहक आणि दूत आहेत. त्या सर्वांसोबत संवाद साधण्यासही मी उत्सुक आहे.