नवी दिल्ली : रघुराम राजन यांना दुसरी संधी न देता प्रचंड वाद ओढवून घेतलेल्या मोदी सरकारनं रिझर्व्ह बँकेची धुरा डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर दिली आहे. 3 सप्टेबरला रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर पटेल रिझर्व बँकेचा पदभार स्वीकारतील. उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर असणार आहेत.

 

52 वर्षांचे उर्जित पटेल गेली 3 वर्ष रघुराम राजन यांच्यासोबत काम करत आहेत. राजन यांच्याप्रमाणेच पटेलसुद्धा येल आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिकून आले आहेत. जागतिक अर्थकारण आणि रणनीती यामध्ये पारंगत मानले जातात.

 

रघुराम राजन आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. त्यामुळं ती धग अनुभवलेल्या उर्जित पटेल यांना नेमकं सरकारला काय हवंय? याचा अंदाज आहे. त्यामुळं भविष्यात आर्थिक धोरणं राबवताना सरकारची अडचण थोडी कमी होईल.