नवी दिल्ली : अंध असूनही यूपीएससीत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या प्रांजल पाटीलच्या पदरी प्रशासनाकडून निराशाच पडली आहे. अंध असल्याचं कारण देऊन प्रांजलला इंडियन रेल्वे अकाऊंट सर्व्हिस नाकारण्यात आली आहे.

यूपीएससीत प्रांजलचा 773 वा रँक होता. मात्र तिला गेल्या चार-पाच महिन्यात प्रशासकीय व्यवस्थेचा चीड आणणारा अनुभव आला आहे.
जर यूपीएससीची परीक्षा घेताना तुम्ही या कॅटेगरींना संधी देता, राखीव पोस्ट ठेवता, तर मग नंतर हे कारण कसं काय देऊ शकता, असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

डीओपीटीनं पोस्ट देताना याचा विचार करायला नको होता का? मुळात अकाऊंट सर्व्हिस ही काही शारीरिक क्षमतेचीच आवश्यकता असलेली पोस्ट नाही. तिथंही आम्हाला संधी का नाकारली जाते, कुठलीही सर्व्हिस द्याल ती चालणार नाही, मला माझ्या मेरिटनुसारच सर्व्हिस मिळायला हवी, अशी मागणी प्रांजलने केली आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंशी भेट नाही झाली, मात्र रेल्वे मंत्रालयातला अनुभवही वाईट असल्याचं प्रांजल सांगते. परीक्षा पास होण्यासाठी जे कष्ट घेतले, त्यापेक्षाही मंत्रालयात जाऊन भेटणं हे महादिव्य असल्याची खंत तिने व्यक्त केली.

अॅटिट्यूड बदलणार नसेल तर अपंगाचं दिव्यांग करुन काय उपयोग, असा संतापजनक सवालही प्रांजलने विचारला आहे. डीओपीटीकडून अजून काहीही रिस्पॉन्स नाही, सगळं कम्युनिकेशन मला स्वत: करावं लागतं, असंही प्रांजलने स्पष्ट केलं.

रेल्वे मंत्रालयाचं उर्मट उत्तर :

'ही मुलगी आमच्याकडे तीन-चार वेळा आली होती. पण आम्ही या केसमध्ये काही करु शकत नाही. कारण ही डीओपीटीची चूक आहे. त्यांनी तिला पोस्ट देताना नीट पाहायला पाहिजे होतं. 100 टक्के अंध असेल तर रेल्वेच्या कुठल्याच खात्यात काम करण्याची संधी नाही' असं उर्मट उत्तर रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.

'अकाऊंट सर्व्हिस असली तरी वेळ आल्यास तिला कधी महिन्यातून दोन वेळा रेल्वेत प्रवास करावा लागू शकतो. अशावेळी रेल्वेतून चालावं लागतं. त्यामुळे रातांधळेपणा, कमी टक्केवारीचा अंधपणा असल्यास आम्ही सेवेत घेतो. पण नियमानुसार 100 टक्के अंध व्यक्तींना नाही. तिला पुढचं कम्युनिकेशन हे डीओपीटी (कार्मिक मंत्रालयाकडूनच) होणं अपेक्षित आहे.' असं स्पष्टीकरण रेल्वेतर्फे देण्यात आलं आहे.