नवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर भाजपला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी राजीनामा दिला आहे. कुशवाह हे मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

बिहारमध्ये जागा वाटपावरुन कुशवाह नाराज होते. राजीनामा देताना कुशवाह म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत". तसेच त्यांनी बिहारमधील नितीश कुमार सरकारवर टीकादेखील केली.

राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून कुशवाह बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका करत होते. त्यांनी आता भाजपची साथ सोडल्याने बिहारमधील राजकीय समीकरणे बदलतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान कुशवाह यांच्यावर भाजपनेही टीका केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद म्हणाले की, "राजकारण संयमाचा विषय आहे. मनुष्य संयम गमावतो तेव्हा त्याच्या विवेकाचा नाश होतो. कुशवाह यांची अशीच अवस्था झाली आहे. कुशवाह यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्याशिवाय भाजप बिहारमध्ये 40 जागांवर विजयी होऊ शकतो".