नवी दिल्ली : संसदेत पुन्हा एकदा राफेलच्या मुद्द्यावरुन हल्ले-प्रतिहल्ले झाले. काँग्रेसच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी स्वतः संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण मैदानात उतरल्या. कमिशन न मिळाल्यानेच यूपीए सरकारने राफेल डील होऊ दिली नाही, असा घणाघात सीतारमण यांनी केला.
राफेल डीलसाठी आठ वर्ष का लागली आणि यानंतरही एकही राफेल विमान भारतात का आणता आलं नाही? असे प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसला विचारले. राफेल करार व्हावा ही यूपीए सरकारची कधीच इच्छा नव्हती. शिवाय कमिशन न मिळाल्यानेच काँग्रेसने डील होऊ दिली नाही, असा आरोप सीतारमण यांनी केला.
काँग्रेसचं रणकंदन म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची बोचरी टीकाही निर्मला सीतारमण यांनी केली. वायूदलाला होणारा त्रास विसरुन तुम्ही डीलमध्ये स्वतःचा फायदा पाहिलात. एनडीएने राफेल विमानांचा आकडा 126 वरुन 36 वर आणल्याचं सांगत देशाची दिशाभूल केली आहे, असा आरोपही सीतारमण यांनी केला.
त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. राफेल विमानांची किंमत हा गोपनीयतेचा मुद्दा असूच शकत नाही. अनिल अंबानींना दिलेल्या कंत्राटाची चौकशी व्हायला हवी, मुळात हे कंत्राट देण्याचा निर्णय कोणाचा होता, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रश्नांची उत्तरं देण्यापासून पळ काढत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी आधी केली होती. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पाच प्रश्न विचारले. 30 हजार कोटी रुपये पंतप्रधान मोदी यांनी अनिल अंबानी यांना दिल्याचंही राहुल गांधींनी पुन्हा सांगितलं. राजधानी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरोप केले होते.
कमिशन न मिळाल्याने यूपीएने राफेल डील होऊ दिली नाही : सीतारमण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jan 2019 05:19 PM (IST)
राफेल डील व्हावं ही यूपीए सरकारची कधीच इच्छा नव्हती. त्यातच, कमिशन न मिळाल्यामुळे काँग्रेसने ही डील होऊ दिली नाही, असा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -