लखनऊ : उत्तर प्रदेशातील अयोध्येत ट्रकखाली चिरडून 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. कानपुरमधून आलेल्या या भाविकांना बेदरकारपणे येणाऱ्या ट्रकने चिरडले असून सात लोक जागीच मृत्यूमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत 7 लोक गंभीर जखमी झाले आहेत.
अयोध्येत सुरू असलेल्या श्रावण उत्सवासाठी हजारो भाविक आले होते. पण प्रशासनाने त्यांच्या राहण्याची कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे हे सर्व भाविक रस्त्याशेजारच्या डिव्हायडरवर झोपले होते. दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी लखनऊच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अयोध्येत सुरू झालेल्या श्रावण महोत्सवासाठी लाखो लोक येतात. 5 ऑगस्टपासून हा महोत्सव सुरू आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था प्रशासनाने न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
या घटनेनंतर भाविकांनी प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. दरम्यान याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.