अलाहाबाद : दलित तरुणाशी लग्न करुन चर्चेत आलेल्या बरेलीतील आमदाराच्या मुलीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने तातडीने दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने साक्षी आणि तिचा पती अजितेशला 15 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. आजच्या सुनावणीनंतर न्यायालयाने या प्रकरणात कोणताही अंतरिम आदेश जारी न करता सुनावणी 15 जुलैपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे याचिका दाखल करुन सुरक्षेची विनंती करणाऱ्या साक्षी आणि अजितेशला तात्काळ कोणताही दिलासा मिळालेला नाही.

"माझ्या आणि माझ्या पतीच्या जीवाला वडिलांपासून धोका आहे," असा दावा उत्तर प्रदेशातील भाजप आमदार राजेश मिश्र यांची मुलगी साक्षीने केला आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात तिने म्हटलं आहे की, "मी वडिलांच्या मनाविरुद्ध एका दलित तरुणासोबत प्रेमविवाह केल्याने त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे."

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
भाजप आमदार राजेश मिश्र यांची मुलगी साक्षीने 4 जुलै रोजी एका दलित तरुणाशी विवाह केला. परंतु वडील आणि कुटुंबापासून धोका असल्याचा दावा तिने केला. त्यामुळे तिने याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सुरक्षेची मागणी केली होती. साक्षीने आपल्या याचिकेत म्हटलं होतं की, "मी सज्ञान असून मर्जीने दलित तरुणाशी विवाह केला आहे. माझे आमदार वडील आणि कुटुंबातील इतर लोक लग्नाच्याविरोधात आहेत. त्यांना आमची हत्या करायची आहे. त्यामुळे त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असून मला आणि माझ्या पतीला सुरक्षा पुरवण्याचा आदेश द्यावा. बरेली पोलिसही वडिलांच्या दबावात काम करत आहेत."

15 जुलै रोजी बाजू मांडावी लागणार
दरम्यान साक्षी आणि तिचा पती अजितेशला 15 जुलै रोजी हायकोर्टात हजर राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यांचा युक्तिवाद पटला तरच न्यायालय या प्रकरणात आदेश जारी करेल. आज या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती वाय के श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर झाली. साक्षीने आपल्या याचिकेत उत्तर प्रदेश सरकार, बरेलीचे पोलिस अधीक्षक, बरेली कॅंटचे एसएचओ यांच्यासोबतच वडील-आमदार राजेश मिश्र यांना प्रतिवादी बनवलं आहे.

काय आहे प्रकरण?


बरेलीच्या बिथरी चैनपूर मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश मिश्र उर्फ पप्पू भरतौल यांची मुलगी साक्षीचं दलित समाजातील अजितेशवर प्रेम होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाला आमदार राजेश मिश्र आणि त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. साक्षी काही दिवसांपूर्वीच घर सोडून गेली आणि 4 जुलै रोजी प्रयागराजच्या एका मंदिरात वैदिक विधीनुसार अजितेशसोबत लग्न केलं. दोघे एका हॉटेलमध्ये लपून राहत होते. पण आमदार राजेश मिश्र यांच्या काही लोकांनी दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनी कसाबसा तिथून पळ काढला आणि गुप्त ठिकाणी गेलो, असा दावा साक्षीने केला.

कोर्टाकडून सुरक्षेची मागणी
साक्षीने यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन स्वत:च्या आणि पतीच्या सुरक्षेसाठी विनंती केली. कोर्टात होणाऱ्या सुनावणीआधी साक्षीने दोन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या दोन्ही व्हिडीओमध्ये तिने आमदार वडील, कुटुंबातील काही सदस्य आणि इतर काही लोकांपासून जीवाला धोका असल्याचा दावा केला. तसंच माझ्या, पतीच्या आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणासोबतही अनुचित प्रकार घडला तर वडिलांना जबाबदार धरलं जावं, असं म्हटलं आहे. साक्षी आणि तिच्या पतीचा हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

राजेश मिश्र यांचा दावा



दुसरीकडे राजेश मिश्र यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करुन मुलीने केलेले आरोप फेटाळले आहेत. "मीडियामध्ये माझ्याविरुद्ध दाखवल्या जाणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. मी कोणालाही धमकी दिलेली नाही. माझी मुलगी सज्ञान असून तिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी कोणालाही जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही, किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही असं कृत्य केलेलं नाही. मी आणि माझं कुटुंब आपल्या कामात व्यस्त आहोत. मी माझ्या मतदारसंघात जनतेचं काम करत आहे," असं राजेश मिश्र यांनी म्हटलं आहे.

"कोणीही त्यांना शोधत नाही आणि मला याबाबत कोणतीही माहिती नाही. तसंच ते कुठे आहेत, हे देखील मला माहित नाही. मी तर कुठे गेलेलो नाही. सगळ्यांना माहित आहे की, मी इथेच आहे. माझी माणसं इथे आहे. भाऊ, पुतण्या आला आहे. कोणी कुठेही गेलेलं नाही आणि कोणी जाणारही नाही. आम्ही आमचं काम करतोय," असंही राजेश मिश्र यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.