यूपी सरकारकडून साखर उद्योगांना 5,535 कोटींची मदत
एबीपी माझा वेब टीम | 24 Sep 2018 01:41 PM (IST)
“ऊस शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती करावी. कारण जास्त साखर खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.”
गोरखपूर : ऊस शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती करावी, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील ऊस शेतकऱ्यांना दिला होता. त्यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले होते, “ऊस शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची शेती करावी. कारण जास्त साखर खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.”. आता त्याच योगी आदित्यनाथ यांनी साखर उद्योगाला 5 हजार 535 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केलीय. ऊस शेतीचं क्षेत्रफळ आणि उत्पादन वाढल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला योग्य भाव मिळत नाहीय. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकराने ऊसाच्या जागी भाजीपाला आणि इतर पिकांच्या शेती करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, साखर कारखाने आणि शेतकरी यांच्या समस्या लक्षात घेऊन, योगी सरकारने आता साखर उद्योगाला 5 हजार 535 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केलीय. उत्तर प्रदेश सरकारने साखरेच्या अत्याधुनिक उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरातील घट यांच्या धोक्यापासून साखर उद्योगाला दिलासा देण्याचा निर्णय घेतला. सरकार साखर कारखान्यांना प्रति क्विटंल खरेदीवर 4.50 रुपये अनुदान देणार आहे. त्याचसोबत, चार हजार कोटी रुपयांचं कर्जही दिले जाणार आहे. त्यामुळे ऊस शेतकऱ्यांना वेळेवर त्यांचा परतावा मिळेल आणि ते ऊसशेती अधिक जोमाने करु शकतील. आधी ऊस शेतकऱ्यांना भाजीपाला किंवा इतर पिकांची शेती करण्याचा सल्ला देणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी आता साखर उद्योगासाठी कोट्यवधींच्या निधीची घोषणा केल्याने, योगी सरकारची ऊस शेतकऱ्यांबद्दल नेमकी भूमिका काय आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.