लखनौ : “मी हिंदू आहे, मी ईद साजरी करत नाही.” असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. तसेच, ज्यांना आपला सण साजरा करायचा आहे, त्यांना सरकार सर्वतोपरी सहकार्य आणि संरक्षण देईल.असं आश्वासनही त्यांनी दिलं.


उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मंगळवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांसह काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, “आम्हाला हिंदू असण्याचा अभिमान आहे. पण आम्ही असे हिंदू नाही की, जे घरात जानवं घालतात, आणि बाहेर टोपी परिधान करतात. अशा कृती तेच लोक करतात, ज्यांच्या मनात पाप आहे.”

महापुरुषांच्या जयंती/ पुण्यातिथीची सुट्टी रद्द करण्यावरुन उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरुनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. उत्तर प्रदेशच्या जनतेने यांची सुट्टी केली आहे. तुमची मानसिकता बिघडली आहे. तुम्ही ‘ग’ वरुन ‘गणेश’ नाही, तर ‘ग’ वरुन ‘गाढव’ शिकवता. पण आम्ही ‘ग’ वरुन ‘गणेश’च शिकवणार”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही आता शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यपुस्तकं आणत आहोत. ज्यात महापुरुषांच्या बाबतीत मुलांना शिकवलं जाईल. या पुस्तकांच्या एक-एक प्रति विरोधकांनाही द्याव्यात, अशी सूचना शिक्षणमंत्र्यांना देतो. ज्यातून विरोधकांना याचा अभ्यास करता येईल.तुमच्या मनात काहीही आलं, म्हणून त्यावरुन आरोप कराल, तर हे चालणार नाही. इथं संसदीय लोकशाही आहे. याचं पालन करावच लागेल.”