तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2018 09:47 AM (IST)
तामिळनाडूत मंगळवारी रात्री समाजसुधारक आणि द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
वेल्लोर : त्रिपुरात रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा तोडल्याचे प्रकरण ताजे असताना, आता तामिळनाडूत मंगळवारी रात्री समाजसुधारक आणि द्रविड आंदोलनाचे संस्थापक ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. वेल्लोर जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना दोन मद्यपींनी केली असून, त्यांची ओळख पटली आहे. या दोघांनीही दारुच्या नशेत तिरुपत्तूरमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी मुथुरमन भाजपचा; तर फ्रान्सिस सीपीआयचा कार्यकर्ता असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्रिपुरात लेनिन यांचा पुतळा तोडल्यानंतर भाजप नेता एच राजा याने याबाबत फेसबुक पोस्ट लिहिली होती. यात त्याने म्हटले होते की, “लेनिन कोण होता. लेनिन आणि भारतामध्ये काय संबंध आहे? भारत आणि कम्युनिस्टांमध्ये काय संबंध आहे? आज त्रिपुरात लेनिनचा पुतळा हटवला. उद्या तामिळनाडूतील ई.व्ही.रामासामी यांची मूर्ती असेल.” या पोस्टवरुन वाद निर्माण झाल्यानंतर, राजा याने ही फेसबुक पोस्ट हटवली होती.