हाफिज सईदचा आदेश, MBA दहशतवाद्याकडून बुखारींची हत्या!
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2018 10:28 AM (IST)
हाफिज सईदने सज्जाद गुल या दहशतवाद्यावर शुजात बुखारी यांच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती.
श्रीनगर : जम्मू काश्मिरमधील 'रायझिंग काश्मिर' वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येचे आदेश हाफिज सईदने दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जम्मू पोलिसांनी ही माहिती दिली आहे. रमजानच्या महिन्यात भारतानं केलेल्या शस्त्रसंधीचं बुखारी यांनी समर्थन केलं होतं. या काळातील दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरही त्यांनी टीका केली होती. त्यामुळे 'लष्कर ए तोयबा' नाराज झाली होती. हाफिज सईदने सज्जाद गुल याच्यावर बुखारींच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती. 48 वर्षांचा सज्जाद गुल हा मूळचा काश्मिरचाच आहे. बंगळुरुमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो लष्कर ए तोयबामध्ये सामील झाला होता. ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची गोळ्या झाडून हत्या दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली गुलला श्रीनगर जेलची हवा खावी लागली होती. मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर पाच वर्षांपूर्वी त्याने पाकिस्तानात पलायन केलं. शुजात बुखारी यांची 14 जून रोजी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला. इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी बुखारी हे संध्याकाळी लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कार्यालयातून निघाले होते. बुखारी गाडीत बसताना काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये शुजात बुखारी यांच्यासह त्यांचा पीएसओ (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी) मृत्युमुखी पडला