लखनऊ: उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर असताना तिथं आज मोठी उलथापालथ झाली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज हा निर्णय जाहीर केला.


अखिलेश यादव यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांनाही पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, काल अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. हे सर्व उमेदवार सायकलऐवजी दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. कालच सकाळी समाजवादी पक्षानं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर अखिलेश यांनी 235 वेगळ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळेच आज त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव विरुद्ध मुलायम सिंग यादव असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.