नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल व्यवहारासाठी 'भिम' हे अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी ग्राहक म्हणून इंटरनेट किंवा कोणत्याही स्मार्टफोनची गरज नाही, असं मोदींनी सांगितलं.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचंही मोदींनी सांगितलं. त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचं नामकरण केलं असल्याची माहिती मोदींनी दिली.

मोदींनी लाँच केलेलं भिम अॅप कसं वापरणार?


नवी दिल्लीत डिजीधन मेला या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भिम अॅप लाँच केलं.

या अॅपमुळे गरिबांना व्यवहार सोपे होणार आहेत. केवळ अंगठा लावून पेमेंट करता येईल. एवढंच नाही, तर हे अॅप गरिबांच्या घरातील आर्थिक महासत्ता असेल, असंही मोदींनी सांगितलं.

एकेकाळी अशिक्षिताला अंगठे बहाद्दर म्हटलं जायचं, पण आता काळ बदललाय, आता तुमचा अंगठाच तुमची ओळख, तुमची बँक असेल, असं मोदी म्हणाले.

विरोधकांना टोला

खोदा पहाड निकली चुहीया असं एक नेता (पी. चिदंबरम) म्हणाला होता, मात्र मला उंदीरच बाहेर काढायचे आहेत, तेच जास्त कुरतडतात, असा टोलाही मोदींनी लगावला.

शिवाय एकेकाळी घोटाळ्यात किती गेले, याची चर्चा होत होती. मात्र आता किती आले, याची चर्चा होत असल्याचं मोदींनी सांगितलं.